वास्तवदर्शी ‘आर्टिकल १५’ चित्रपट बघून विद्यार्थी झाले अंतर्मुख

0
488

पुणे, दि. १४ (पीसीबी) – जात, लिंग, धर्म, वंश भेद या समाजातील नकारात्मक गोष्टींचा जराही लवलेश न झालेल विद्यार्थ्यांच भावविश्व असते. परंतु, बाल्यावस्था संपून तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असणाऱ्या पिढीला चौकटी पलीकडील जग कळावे, त्यांच्यात समाजभान निर्माण व्हावे, आणि त्यांनी यात बदल घडवावा या उद्देशाने, विखे पाटील मेमोरियल स्कूलने आठवी ते बारावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या सुमारे ५८० विद्यार्थ्यांना आणि २५ शिक्षकांना ‘आर्टिकल १५’ हा चित्रपट आज दाखविला.वास्तवदर्शी असणाऱ्या ‘आर्टिकल १५’ चित्रपटाने विद्यार्थ्यांना अंतर्मुख केले.

सीबीएसई अभ्यासक्रमाच्या ‘सामाजिक अभ्यास’व संवर्धन या अंतर्गत हा उपक्रम राबविला गेला.मुख्यध्यापिका मृणालिनी भोसले यांच्यासह उपमुख्याध्यापक अमोल पाटील, समस्त शिक्षक व इतर वरिष्ठ समन्वयकही यावेळी उपस्थित होते.

याविषयी अधिक माहिती देताना मुख्याध्यापिका म्हणाल्या की, सीबीएसईने विषय संवर्धनाचे काही उपक्रम प्रस्तावित केले आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर या उपक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना या चित्रपटाचे मूल्यांकन इंग्रजी, मराठी/ फ्रेंच आणि नागरिक शास्त्र या विषयांसाठी लिहावे लागेल. मुले संवेदनशील असतात, त्यामुळे या चित्रपटातील त्यांना जाणवलेल्या बाबी ते ठळकपणे व समर्पक शब्दांत मांडू शकतील, असा विश्वास वाटतो.   बारावीचे विद्यार्थी म्हणाले की, जातीव्यवस्थेवर खरमरीत भाष्य करणारा आणि त्यावर विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे. आपल्या संविधानाने आपल्या नागरिकांना ठोस अधिकार प्रदान केले आहेत परंतु प्रत्यक्षात त्याचा वापर केला जात नाही, हेच या चित्रपटातून प्रकर्षाने जाणवते.