वाळू चोरी प्रकरणी चार जणांना अटक; 76 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
389

मोशी, दि. २५ (पीसीबी) – शिरूर तालुक्यातील घोड नदी पात्रातील वाळूचा बेकायदेशीरपणे उपसा करून महसूल विभागाची कोणतीही परवानगी न घेता वाळू विक्री करण्यासाठी मोशी गाव येथे आणण्यात आली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करत सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तसेच त्यातील चार जणांना अटक केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी 76 लाख 52 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जागा मालक नवनाथ गोविंद सस्ते (वय 41), ड्रायव्हर सतीश आजिनाथ जाधव (वय 26, दोघे रा. मोशी), ड्रायव्हर रमेश नामदेव घनवट (वय 41, रा. सरदवाडी, ता. शिरूर), ड्रायव्हर लखन चंद्रकांत राठोड (वय 27, रा. मोशी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह ट्रक मालक अजित गोविंद सस्ते (वय 38, रा. पाईट, ता. खेड), ट्रक मालक चेतन वाखारे (वय 28, रा. शिरूर), ट्रक मालक नितीन टेकाळे (वय 36, रा. मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार नितीन लोंढे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व अप्रामाणिकपणे शिरूर तालुक्यातील घोड नदी पात्रातील वाळूचा उपसा केला. वाळूची चोरी करून महसूल विभागाची कोणतीही परवानगी न घेता पर्यावरणाचा -हास करून बेकायदेशीरपणे ही वाळू विक्रीसाठी आरोपी नवनाथ सस्ते याच्या मोशी येथील जागेत आणली. याबाबत माहिती मिळाली असता सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी 75 लाख रुपयांचे चार ट्रक आणि एक लाख 52 हजार रुपयांची 19 ब्रास वाळू असा एकूण 76 लाख 52 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.