Banner News

वाळू चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

By PCB Author

January 15, 2020

पुणे, दि.१५ (पीसीबी) – वाळू चोरीस आळा घालण्यासाठी महसूल व पोलीस विभागाच्या वतीने वाळू चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. हवेली व शिरुर तालुक्यातील वाळू चोरी रोखण्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. राम यांच्या अध्यक्षतेखाली व शिरुरचे आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.   यावेळी ते बोलत होते             

जिल्हाधिकारी राम म्हणाले, अवैध वाळू वाहतुकीस आळा घालण्यासाठी ज्या गावात वारंवार वाळू चोरीचे प्रकार घडत आहेत, अशा गावांची व वाळू चोरी करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची यादी तयार करावी.  पोलीस स्टेशन निहाय भरारी पथके तयार करावीत. तसेच तपासणीसाठी चेकपोस्ट तयार करावेत. वाळू चोरीचे प्रकार आढळून येणाऱ्या भागांतील संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आढळून आल्यास  त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी श्री.राम यांनी यावेळी दिल्या.

यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख आदि उपस्थित होते.