Pimpri

वारिस पठाण यांनी तमाम देशवासीयांची जाहिर माफी मागावी – भाईजान काझी

By PCB Author

February 22, 2020

पिंपरी , दि.२२ (पीसीबी) – खराळवाडी पिंपरी येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात भाईजान काझी यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम धर्मियांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

बंगळुरु येथे झालेल्या सभेत माजी आमदार वारिस खान पठाण यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले. देशातील पंधरा कोटी मुस्लिम नागरिकांचा ठेका त्यांना कोणी दिला ? असा संतप्त सवाल हज यात्रा कमिटीचे माजी अध्यक्ष भाईजान काझी यांनी उपस्थित केला. वारिस खान पठाण यांनी केलेले वक्तव्य मागे घ्यावे व तमाम देशवासीयांची जाहिर माफी मागावी. त्यांच्या या वक्तव्याचा पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम बांधव तीव्र निषेध करीत आहेत.

यावेळी काझी म्हणाले की , बंगळूरु येथील सभेमध्ये देशविरोधी घोषणा देणा-या मुलीच्या हातातील माईक खासदार ओवेसी यांनी हिसकावून घेतला. परंतू माजी आमदार पठाण याला का थांबविले नाही ? त्यांनी दोन धर्मांमध्ये वितुष्ठ , तेढ निर्माण करणारे निरर्थक वक्तव्य हे निव्वळ सवंग प्रसिध्दीसाठी केले आहे. भारतावर आतापर्यंत अनेक आक्रमणे झाली. पंरतू बहुभाषीक , बहुधार्मिक नागरिकांमध्ये नेहमी एकजूट राहिली. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार देशाचे अखंडत्व कायम राखण्यासाठी , समता , बंधूता वृध्दींगत करण्यासाठी देशातील तमाम हिंदू , मुस्लिम , शीख , बौध्द , ख्रिश्चन , पारशी या सर्व धर्मियांचे योगदान आहे. भारतामध्ये सर्व धर्मिय गुण्यागोविंदाने नांदावे अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली व माजी आमदार वारिस खान पठाण यांचा निषेध केला.

यावेळी जुलूस कमिटीचे अध्यक्ष हाजी गुलाम रसूल , राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष युसूफ कुरेशी , रमजान अत्तार , इमरान सोलापूरे , नियाज देसाई , ईद्रीस मेमन , अकबर मुल्ला , जाफर मुल्ला , जहिर खान आदी उपस्थित होते.