Pune

वारजेतील ‘त्या’ ४ अल्पवयीन मुली समुद्रकिनारा पाहायला मुंबईला गेल्या…पण समोर काही वेगळंच वाढून ठेवलं होत…

By PCB Author

January 13, 2021

– कुठून येते एवढे धाडस

वारजे, दि.१३ (पीसीबी) : घरात आईवडिलांच्या आणि आजीच्या ओरड्याला कंटाळून आणि मुंबईतील समुद्र किनारा पाहण्यासाठी पुण्याच्या वारजे परिसरातील चार अल्पवयीन मुलींनी घरात कोणाला काही कल्पना न देता मुंबईला पोहचल्या. मात्र, रात्र झाली तरी मुली परत न आल्यामुळे घाबरलेल्या आई-वडिलांनी पोलिसांत धाव घेतली. आणि त्यानंतर सुरु झाले सर्च ऑपरेशन! वारजे पोलिसांनी अवघ्या चार तासांत या मुलींचा शोध लावला आणि कुटुंबीयांच्या ताब्यात सोपवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी येथील या चारही मुली म्हाडा वसाहतीत रहातात. एक 12 वर्षाची, तर 13 वर्षाच्या दोन व एक 16 वर्षाची मुलगी आहे. या मुली शिक्षण घेत असून दरम्यान मोल मजुरी करणारे हे कुटुंब आहेत. गेल्या मार्चपासून कोरोनाने लॉकडाऊन झाल्याने या चारही मुली घरातच अडकून पडल्या होत्या. त्यात घरातील आजी व आई वडील त्यांना चिडचिड करत असत. मोबाईल किंवा अभ्यास यामुळे ते चिडत असत. ते सहज म्हणून या मुलींना बोलत असत. पण मुलींना याचा खूपच त्रास होत होता. त्यामुळे या मुलींनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच मुंबईतील समुद्र किनारा पाहण्याचा मानस केला. पण त्यासाठी पैसे लागणार होते.

यावेळी दोन मुलींनी आपले पायातील पैंजण विकण्याची तयारी दाखविली. त्यांनी सोन्या मारूती चौकात पैंजण विकले. प्रत्येकीने पैशाची जुळवाजुळव केल्याने त्यांच्याकडे जवळपास 5 हजार रूपये जमा झाले. त्यांचे घरातून बाहेर पडण्याचे ठरले. रविवारी दुपारी चौघीही मुंबईला जाण्यासाठी बॅगा घेऊन घराबाहेर पडल्या. काही तास गेल्यानंतर चौघीही मुली घरी न आल्याने त्यांच्या आई-वडीलांनी शोधा-शोध सुरू केली.

परंतु, रात्री आठ वाजले तरी त्या न आल्याने त्यांनी शेवटी वारजे माळवाडी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणात पोलीस निरीक्षक शंकर खटके व गुन्हे निरीक्षक अमृत मराठे यांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी मुलींकडील असलेल्या मोबाईलचे लोकेशन मिळविले असता त्या मुली वडगाव मावळ परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार पथकाला वडगाव मावळ येथे रवाना करण्यात आले.

ह्या मुली मुंबईकडे जात असल्याची शक्यता वाटल्याने मुंबई सीएसटी पोलीस ठाणे, मुंबई कन्ट्रोल रूम यांना मुलींबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलींचे फोटो व वर्णन व्हॉट्सअपद्वारे पाठवले. त्यानुसार सीएसटी पोलिसांशी संपर्क साधला. वर्णनानुसार चार मुली पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सीएसटी स्थानकात उतरल्या. त्यावेळी त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. त्यांनंतर ठाण्यातील उपनिरीक्षक एम. एस. भोईने व त्यांच्यासोबत पथक मुलींना आणण्यासाठी पाठविले. दरम्यान, मुंबईतून मुलींना सुखरूप पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या आई-वडिलांच्या हवाली करण्यात आले. मुलींच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले. पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.