वारकऱ्यांना वेठीस धरणारे मावळे असूच शकत नाहीत! आषाढी पुजेसाठी जाणार नाही -मुख्यमंत्री

0
531

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत ७६ हजार पदांची मेगाभरती रद्द करावी, अशी मागणी करून आषाढी एकादशीला पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजा करू देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाने दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदा श्री विठ्ठलाची परंपरागत पूजा न करण्याचा निर्णय जाहीर केला. 

वारकऱ्यांना वेठीस धरणारे शिवरायांचे मावळे असूच शकत नाहीत, असे सांगत पंढरपुरातील दहा लाख वारकऱ्यांच्या जीविताच्या सुरक्षिततेचा विचार करता पंढरपूरला जाऊन विठाेबाची पूजा न करण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस म्हणाले. माझ्या विठ्ठलाची पूजा मी घरीच करेन, अशी भूमिका फडणवीस यांनी रविवारी मुंबईत प्रसार माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केली. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद मुंबईतही उमटले असून रविवारी कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी ठिय्या अांदाेलन करत सरकारच्या विराेधात घाेषणाबाजी करून निषेध नाेंदवला.