Banner News

“वाय फाय”ने जगणे केले हाय फाय; व्यवसायवृद्धीसाठीही मोठ्या प्रमाणात होतोय वापर

By PCB Author

June 25, 2018

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – वाय फाय हे नाव काही वर्षांपूर्वी फारसे परिचयाचे होते. मात्र, आजघडीला वाय फाय तंत्रज्ञान सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. वाय फायचे पूर्ण नाव आहे Wireless Fiedility (WiFi). या बिनतारी तंत्रज्ञानाद्वारे कोणत्याही वायरशिवाय संगणक किंवा मोबाईल जोडले जाऊ शकते. वाय फायच्या माध्यमातून अत्यंत सहजरीत्या माहितीचे आदान-प्रदान करता येते. त्याचा वापर करून व्यवसायवृद्धीचे यशस्वी प्रयत्न होत आहेत.

अनेक उपकरणांमध्ये इंटरनेट किंवा वाय फाय फिचर असतेच. खरंतर या सेवेमुळे त्या उपकरणात जीव येतो. संगणक, व्हिडिओ-गेम कन्सोल, स्मार्टफोन, डिजिटल कॅमेरे, टॅबलेट, डिजिटल ऑडिओ, आधुनिक प्रिंटर यांसारख्या उपकरणांचा यात समावेश आहे. इंटरनेट सेवेच्या वापरात आशिया खंडात चीनखालोखाल भारताचा क्रमांक लागतो. जानेवारी २०१८ पर्यंतच्या आकडेवारीनुसार चीनमध्ये ७५१ दशलक्ष, तर भारतात ४६२ दशलक्ष नागरिक इंटरनेट सेवेचा वापर करतात. २०१६ पर्यंत भारताच्या एकूण लोकसंख्येच्या २४.३ टक्के नागरिक मोबाईलवर इंटरनेट वापरत होते. ही संख्या झापट्याने वाढत आहे. २०२१ पर्यंत भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या तब्बल ६३५ दशलक्षपर्यंत पोचण्याचा जाणकारांचा अंदाज आहे.

मोबाईल क्रांतीमुळे इंटरनेट सेवा घराघरांत पोचली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यांतील घडामोडी अत्यंत वेगाने सर्वत्र पोचतात. परिणामी, देशाच्या विकासाची गतीदेखील वाढते. भविष्यात जेव्हा इंटरनेट सेवेच्या विस्ताराचा इतिहास अभ्यासला जाईल तेव्हा वाय फाय तंत्रज्ञानाचा उल्लेख आवर्जून केला जाईल. इंटरनेट वापरामुळे प्रत्येकाच्या हातातील स्मार्टफोनमुळे संपूर्ण जग चुटकीसरशी पालथे घालता येते. दैनंदिन छोट्या-मोठ्या कामांपासून थेट ऑफिसच्या महत्त्वाच्या कामांपर्यंत सर्वच त्यामुळे सोपे झाले आहे. या तांत्रिक जडणघडणीमध्ये खेडीदेखील सामील होऊन डिजिटल होत आहेत.

इंटरनेट फक्त घरात, ऑफिसमध्ये म्हणजेच ज्या ठिकाणी वाय फायचे राउटर आहे तेथेच वापरता येते. वाय-फायची जोडणी पासवर्डशिवाय चालू होत नसल्याने ज्याला पासवर्ड माहीत असेल, तोच वापरू शकतो. देशात डिजिटल इंडियाचे वारे वेगाने वाहत आहे. बसस्थानकापासून रेल्वे स्टेशन, विमानतळ, मॉल, बाजार, हॉटेल एवढेच नव्हे, छोट्या व्यापारी संस्थांमध्येसुद्धा मोफत वाय फायद्वारे नागरिकांना आकृष्ट केले जाते.