वायसीएम रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वी महिलेच्या जबड्यातील हाडाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश

0
519

पिंपरी, २३ (पीसीबी) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात अनिता निर्मळ (वय ४३) यांच्या जबड्याच्या सांध्यात तयार झालेली हाडाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले.

गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत अनिता निर्मळ यांच्या जबड्याच्या सांध्याच्या हाडाची अनियमित वाढ झाली होती. दोन्ही जबड्याच्या मागील दाढा एकमेकांना टेकू शकत नसल्याने त्यांना अन्न व्यवस्थित चावता येत नव्हते. जबड्याच्या सांध्याच्या हाडाची रचना बदलल्यामुळे रुग्णाचे तोंड वाकडे झाले होते. रुग्णाच्या जबड्याच्या सांध्यामध्ये 35x18x21 मिलीमीटर आकाराची हाडाची गाठ तयार झाली होती. ही गाठ जबडा उघडणे, बंद करणे या क्रियेमध्ये अडथळा निर्माण करत होती. त्यामुळे दातावर दात ठेवून योग्य प्रकारे अन्नपदार्थ चावणे त्यांना अशक्य झाले होते. जबड्याच्या सांध्यामध्ये अशाप्रकारे हाडाची वाढ होणे, हा आजार अतिशय दुर्मिळ आहे आणि जबड्याच्या सांध्याला उघडून त्यावर शस्त्रक्रिया करणे हे अत्यंत कठीण आणि जोखमीचे असते. मात्र वायसीएम रूग्णालयाचे दंतरोग विभागप्रमुख डॉ. यशवंत इंगळे, तसेच डॉ. निलेश पाटील, मुखशल्य चिकित्सक डॉ. अभिजित फरांदे, डॉ. वसुंधरा रिकामे, डॉ. प्रीती राजगुरू यांनी रुग्णाच्या जबड्याच्या सांध्यावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली.  

यामध्ये वायसीएम रुग्णालयाचे न्युरोसर्जन डॉ. अमित वाघ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.