Maharashtra

वादळाचा ओसरेपर्यंत सुरक्षित स्थळी थांबा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नागरिकांना आवाहन

By PCB Author

June 03, 2020

मुंबई, दि. 3 (पीसीबी) : अरबी समुद्रात निर्माण झालेलं निसर्ग चक्रीवादळ आज दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषत: अलिबाग, पालघर परिसरात धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातंच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबावं. वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करु नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. चक्रीवादळापासून जिवितहानी, वित्तहानी होऊ नये म्हणून प्रशासनानं संपूर्ण दक्षता घेतली आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. लाईफगार्ड, पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान सज्ज ठेवण्यात आले आहेत. आरोग्य यंत्रणा, स्थानिक प्रशासनही दक्ष आहे. राज्याची संपूर्ण यंत्रणा तत्पर असून आवश्यकतेनुसार तात्काळ मदत उपलब्ध करण्याचं नियोजन झालं आहे. या वादळाचा वेग आणि ताकद मोठी असल्यानं नागरिकांनी सावध, सुरक्षित रहावं, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.