वादग्रस्त श्रीपाद छिंदमचा महापालिका निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

0
651

अहमदनगर, दि. १६ (पीसीबी) – अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमने  महापालिका निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. श्रीपाद छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याने राज्यभरात चांगलाच गदारोळ झाला होता. आता त्यांने अर्ज दाखल केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

छिंदमने फोन संभाषणात शिवरायांबद्दल अपशब्द काढल्याची ऑडिओ क्लीप वायरल झाली होती. त्यानंतर राज्यभर संताप व्यक्त केला गेला होता. त्यानंतर उपमहापौरपदी असलेल्या श्रीपाद छिंदमचे भाजपमधूनच निलंबन करण्यात आले होते. महापालिकेच्या  महासभेत छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेकडे सादर झाला होता.

छिंदमविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला तुरुंगवासही भोगावा लागला होता. छिंदमला सशर्त जामीन मंजूर झाल्यानंतर तो अज्ञातस्थळी गेला होता. राजकीय अकसापोटी मला गुंतवण्यात आल्याचे आपल्या जामीन अर्जात त्याने म्हटले होते.

श्रिपाद छिंदम निवडणूक लढवणार की नाही, याबाबत चर्चा सुरु होती. त्यातच अहमदनगर मधील प्रभाग क्रमांक ९ मधून त्याने अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. त्यामुळे अहमदनगरमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवार, ९ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे,