“वाढीव वीजबील समस्येवर सरकारकडून फक्त आश्वासनं; हे प्रकरण अडकलंय तरी कशात?” ठाकरे सरकारवर राज ठाकरेंचा खोचक टोला

0
304

मुंबई, दि. २९ (पीसीबी) : राज्यातील जनतेला येत असलेल्या वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने निर्णय घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. राजभवनात राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनीही माहिती दिली.

वीजबिलांचा विषय मनसे लावून धरत आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं करत आहे. अदानी, वेस्टची लोकं भेटली. आम्ही बिल कमी करु शकतो मात्र एनईआरसी कमी करावा लागेल. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणं झालं. लवकरात लवकर निर्णय घेऊ असं ते सांगतात. परंतु अद्याप निर्णय झालेला नाही. राज्यपालांशी बोललो, ते म्हणाले शरद पवारांचा सल्ला घ्या. मी शरद पवारांना भेटणार आहे. हा विषय राज्य सरकारला माहित आहे, मग हे प्रकरण कशात अडकलंय हे कळत नाही. त्यासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. त्याच संदर्भात पहिलं निवेदन राज्यपालांना भेटून दिलं आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

“मी शरद पवार यांच्याशी बोलणार आहे, फोनवरुन बोलेन किंवा प्रत्यक्ष भेटून बोलेन. वेळ पडल्या मुख्यमंत्र्यांची भेट घेईन. मात्र त्यांना कोणताही विषय सांगितला तर त्यावर काम सुरु आहे. काम सुरु आहे, पण निर्णय व्हावा. त्यामुळे लोकांची भावना पाहता सरकारने एक-दोन दिवसात निर्णय घ्यावा, अशी विनंती आहे. पुढे त्यांच्याशी बोलणार आहे. राज्यपालही बोलणार त्यांच्याशी बोलणार आहेत. परंतु सरकार आणि राज्यपालांमधील सख्य पाहता हा विषय किती पुढे जाईल याची मला कल्पना नाही. राज्याचे प्रमुख म्हणून राज्यपाल सरकारशी बोलतील,” असं राज ठाकरे म्हणाले.

“विषय खूप आहेत पण सरकारने निर्णय घ्यायला हवेत. आपल्याकडे प्रश्नांची कमतरता नाही, निर्णयांची कमतरता आहे,” असंही राज ठाकरे यांनी सागितलं