वाढती टँकर संख्या म्हणजे जलयुक्त योजनेत भ्रष्टाचार; जलसंपदा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा – काँग्रेस

0
564

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – राज्यातील अनेक भागात रोज वाढत चाललेल्या टँकरच्या  संख्येवरून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे अधोरेखित होत आहे. भ्रष्टाचारामुळे  जलयुक्त शिवार योजना सपशेल अपयश  ठरली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते  सचिन सावंत यांनी केला.

सद्य स्थितीत नोव्हेंबर महिन्यात राज्यात टँकरच्या संख्येत झालेली वाढ चक्रावून टाकणारी आहे. या वर्षी राज्यात जवळपास ७४.४ टक्के पाऊस झाला आहे. पाणीपुवठा विभागाच्या आकडेवारीनुसार १७ नोव्हेंबर२०१८ पर्यंत राज्यात एकूण ७१५  टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.

२०१४  साली राज्यात  ७०.२ टक्के म्हणजे या वर्षीपेक्षा कमी पाऊस पडला होता. त्यावेळी १७ नोव्हेंबर २०१४ च्या आकडेवारीनुसार राज्यात केवळ ७१ टँकर सुरु होते. तर २०१५ मध्ये राज्यात त्याहीपेक्षा कमी म्हणजेच ५९.४ टक्के पाऊस झाला होता. १६ नोव्हेंबर २०१५ च्या आकडेवारीनुसार त्यावेळी  ६९३ टँकर  सुरु होते.

यातूनच जलयुक्त शिवार योजनेत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध होत आहे. या योजनेवर खर्च झालेले ७ हजार ७८९ कोटी रुपये हे जलयुक्त शिवारच्या खड्ड्यांमध्ये मुरले का? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे. तर या योजनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, त्याचबरोबर  जलसंपदा मंत्र्यांनी या भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारुन  राजीनामा द्यावा, अशी मागणीही  सावंत यांनी केली.