वाढती गुन्हेगारी… पिंपरी-चिंचवड शहरात एकाच दिवशी तब्बल ‘एवढ्या’ चोरीच्या घटना; धक्कादायक आकडा आला समोर

0
294

पिंपरी, दि. 19 (पीसीबी) : वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण झाले आहेत. वाहन चोरी, सोनसाखळी, मोबाईल फोन हिसकावणे हे प्रकार नित्याचे झाले आहेत. बस प्रवास देखील सुरक्षित राहिलेला नाही. प्रवासादरम्यान सोने, पैसे, बॅग चोरीला जात आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (दि. 18) घरफोडी, वाहन चोरी, मोबाईल चोरी आणि अन्य चोरीच्या तब्बल १२ गुन्ह्यांची विविध पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

आळंदी मधून 50 हजारांची, दिघी मधून 30 हजारांची तर वाकड मधून 10 हजारांची दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. चाकणमधून चार लाखांची स्विफ्ट कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे खाद्य तेलाची डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या एका टेम्पो मधून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 66 हजार 670 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार सोमवारी भर दिवसा दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास घडला.

निगडी पोलीस ठाण्यात एक चोरीचा गुन्हा दाखल आहे. निगडी मधील मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी एका महिलेची पर्स आणि त्यातील सहा हजार रुपये रोख रक्कम, कागदपत्रे गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेली. हा प्रकार देखील भर दिवसा दुपारी दीड वाजता घडला आहे.

खेड तालुक्यातील कुरुळी येथे बेक्टोकेम कन्सल्टंट इंजिनिअरिंग प्रा ली या कंपनीच्या बाहेर ठेवलेले एक लाख 25 हजारांचे पाच पॉलीशड अँड फिनीशड टॉप लीडकव्हर्स टॅंक चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

कुरुळी येथील व्हिटेक इंडस्ट्रीज मधून अज्ञात चोरट्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या एक लाख 72 हजार 550 रुपयांच्या केबल वायर चोरून नेल्या. हा प्रकार सोमवारी सकाळी नऊ वाजता उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

भोसरी येथे बीआरटी बस स्टॉपवर फीट केलेला ऍल्युमिनिअमचा दरवाजा चोरण्यासाठी एक व्यक्ती रिक्षा घेऊन आला. त्याने दरवाजा काढून चोरून नेताना एका व्यक्तीने पाहिले. आपल्याला कुणीतरी पाहिले असल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने दरवाजा टाकून रिक्षा घेऊन पळ काढला. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

भोसरीमधील गावजत्रा मैदान येथील भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी गेलेल्या एका महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल फोन चोरून नेला. हा प्रकार रविवारी सायंकाळी साडेसात वाजता घडला आहे. ननावरे वस्ती, बाणेर येथे एका बांधकाम साईटवरून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 50 हजार 802 रुपयांच्या पेंटच्या बकेट आणि टाईल्स चोरून नेल्या आहेत. बनावट चवीच्या साहाय्याने कुलूप उघडून चोरट्यांनी हा प्रकार केला असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाभाडे वस्ती, च-होली येथे शतवापली करत असलेल्या एका महिलेच्या गळ्यातून 55 हजारांचे सोन्याचे गंठण हिसकावल्याची घटना घडली. सोमवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी हा प्रकार केला आहे. दिघी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.