Maharashtra

वाजपेयी जेव्हा विठ्ठलदर्शनासाठी पंढरपूरात आले होते

By PCB Author

August 17, 2018

पंढरपूर, दि. १७ (पीसीबी) – अजातशत्रू, प्राणाणिक व कणखर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असणारे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयीच्या आठवणींची दाटी साऱ्यांच्य मनात झाली आहे. वाजपेयी आणि पंढरपूरचेही प्रेमाचे नाते होते. जनसंघापासून ते येथे येत असत. पंतप्रधान असताना २००४मध्ये त्यांनी धनगर समाजाच्या मेळाव्याच्या निमित्ताने पंढरपूरला भेट दिली होती.

वाजपेयी यांनी जनसंघाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर देशभर दौरे केले होते. १९७४ मध्ये त्यांनी सोलापूरसह पंढरपूरचा दौरा केला. त्यानंतर १९८८मध्ये त्यांनी पंढरपूरला पुन्हा भेट दिली. आपले सरकार आल्यावर विठ्ठलाच्या या पंढरीनगरीच्या समस्या सोडवू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले होते. १९९६मध्ये भाजपचे सरकार आले तेव्हा वाजपेयींनी पंढरपूरच्या रेल्वे रुंदीकरणासह अनेक योजनांसाठी निधी दिला होता. त्यांच्याच कॅबिनेटमधील पर्यटनमंत्री जगमोहन यांनी २००३मध्ये पंढरीचा दौरा केला व पालखी मार्गावरील संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखीतळाचा विकास तसेच पंढरीत तीन कोटी रुपये खर्च करून दर्शन हॉल उभारण्यास मंजुरी दिली होती.