वाकड, एमआयडीसी भोसरी परिसरात लुटमारीच्या दोन घटना; 34 हजारांचा ऐवज पळवला

0
511

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – वाकड आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लुटमारीच्या दोन घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये पाच चोरटयांनी मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण 34 हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. याप्रकरणी रविवारी (दि. 7) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हनुमंत दुंदा नाडेकर (वय 31, रा. पवनानगर, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन अनोळखी इसमांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवनानगर, रहाटणी येथे शनिवारी (दि. 6) रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादीचे पार्टनर विजय पवार यांचा पुतण्या प्रथम याला आरोपींनी लाकडी दांडक्याने व रॉडने मारहाण करून जखमी केले. त्याच्या जवळील पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन व दोन हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण सात हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी हिसकावला. फिर्यादी व विजय पवार तो ऐवज परत घेण्यासाठी तसेच आरोपींना पकडण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना मारहाण करून जखमी केले. तसेच ऐवज घेऊन आरोपी निघून गेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

सुहास सावळाराम पायाळ (वय 29, रा. बालाजीनगर, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व विकास सिंग तसेच अमितकुमार सिंग हे शनिवारी (दि. 6) रात्री साडेनऊच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी फिर्यादीकडील तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल तसेच 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि 14 हजार रुपयांची रोख रक्कम, असा 27 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी मारहाण करून जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.