वाकड येथील एका वृध्द शेतकऱ्याची तब्बल १ कोटी १९ लाख ७५ हजार रुपयांची आर्थीक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे. ही फसवणुक  डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ दरम्यान करण्यात आली.

बापू नामदेव वाकडकर (वय ६५, रा. वाकड, पुणे) असे आर्थीक फसवणूक झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी सूरज प्रकाश बोरोले (वय ३५), किरण नितेश सिंग, नितेश कुमार सिंग (तिघेही रा. सेलीना पार्क, हडपसर, पुणे) यांच्याविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापू वाकडकर यांनी वाकड येथे असलेली वडिलोपार्जित जमीन एका बांधकाम व्यावसायिकाला विकली. त्याचे पैसे त्यांनी एचडीएफसी बँकेत ठेवले. बँकेने डिसेंबर, २०१६ मध्ये त्यांच्या खात्यावरील व्यवहार पाहण्यासाठी आरोपी सूरज याची नेमणूक केली. सुरुवातीला सूरजने चोख व्यवहार पाहिले. काही कालावधीनंतर काही पैसे म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवण्याचा सल्ला सूरजने वाकडकर यांना दिला. त्याचा फायदा समजल्यानंतर वाकडकर यांनी त्यास संमती दिली. तसेच वाकडकर यांच्या खात्यावरील काही रक्कम अॅक्सिस बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवण्याचा देखील सल्ला दिला. त्यासाठी बँकेचे काढलेचे चेकबुक सूरजने स्वतःकडे ठेवून घेतले. तसेच चेकबुकवर आणि कोऱ्या कागदावर वाकडकर आणि त्यांची पत्नी, मुलगा आणि सुनेच्या सह्या घेतल्या. वाकडकर यांच्या खात्यावरून वेळोवेळी तब्बल १ कोटी १२ लाख रुपये काढून स्वतःच्या खात्यावर ठेवले.

तसेच वाकडकर यांच्या सुनेला मुलांच्या भवितव्यासाठी गुंतवणूक करण्याचे कारण सांगून त्यांच्याकडून तब्बल ३१ महिने दरमहा २५ हजार रुपये घेतले. ते पैसे देखील सूरजने स्वतःच्या खात्यावर ठेवले. दरम्यान, एचडीएफसी बँकेने सूरजला नोकरीवरून काढून टाकले. नोकरीवरून काढून टाकल्याची माहिती सूरजने वाकडकर यांच्यापासून लपवून ठेवली. वाकडकर यांना वेळोवेळी थोडीफार रक्कम देऊन आणि पैसे असल्याचे भासवून त्यांची दिशाभूल केली. एक वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा झाला नसल्याचे तसेच सूरजने आपली फसवणूक केल्याचे वाकडकर यांच्या लक्षात आले. त्यावरून सूरज आणि त्याचे दोन साथीदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.