वाकडमध्ये मुलीला अपहरण करण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या दोन अभियंत्यांना ठोकल्या बेड्या

920

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – फेसबुकवरून नंबर घेवून मुलीला अपहरणाची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या दोन उच्च शिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. फळ विक्रेता, डॉक्टर, रिक्षावाला, पंक्चर काढणारा, पान टपरीचालक असे वेषांतर करून पोलिसांनी सापळा रचला व त्यात दोन्ही आरोपी अलगद अडकले.

रोहित विनोद यादव आणि अभिनव सतीश मिश्रा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही अभियंता असून त्यांचे शिक्षण पुण्यात झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी बी-टेकपर्यंत शिकलेले आहेत. त्यांनी माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून एका गर्भश्रीमंत कुटुंबाकडे खंडणी मागितली होती. यासाठी दिल्ली, कानपूर, कोलकाता, लखनऊ अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून लँडलाइनवरून संबंधित कुटुंबातील महिलेला खंडणीसाठी फोन केले होते. दिल्ली व पुणे विमानतळ परिसरातील लँडलाइन फोनचाही आरोपींनी वापर केल्याचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. १९ सप्टेंबरपासून या सर्व प्रकाराला सुरुवात झाली होती. पोलिसांनी आज (शनिवारी) दुपारच्या सुमारास या आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली. क्रेडिट कार्डचे कर्ज, नोकरी गेल्याने आणि इतर आर्थिक विवंचनेतून या दोघा उच्च शिक्षित तरुणांनी खंडणी मागितल्याचे तपासात उघड झाले आहे.

ज्या कुटुंबाकडे खंडणी मागण्यात आली होती, त्या कुटुंबाने त्यांची सर्व माहिती फेसबुकवर आणि अन्य सोशल नेटवर्किंग साइट्सवर अपलोड केली होती. या माहितीचा आधार घेऊन दोन्ही उच्चशिक्षित आरोपींनी या कुटुंबाकडे खंडणी मागण्याचे निश्चित केल्याचे तपासात उघड झाले आहे. वाकड पोलिस तपास करत आहेत.