वाकडमध्ये पाण्याची टाकी उभारण्यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबवा – नगरसेवक संदिप कस्पटे

792

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – वाकड, पिंपळेनिलख प्रभाग क्रमांक २६ मधील वाकड सर्वे क्रमांक २०९ येथे पाण्याची टाकी उभारण्यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी. टाकी उभारण्याचे काम जलदगतीने करून या भागातील नागरिकांची पाणीटंचाईपासून सुटका करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक संदिप कस्पटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात नगरसेवक संदिप कस्पटे यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “वाकड सर्वे क्रमांक २०९ मधील ३० आर जागा प्राधिकरणाने पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्यासाठी महापालिकेला हस्तांतरीत केली आहे. जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मी वारंवार पाठपुरावा केला होता. अनेक अडथळे पार केल्यानंतर महापालिकेने ८ महिन्यांपूर्वी ही जागा आपल्या ताब्यात घेतली आहे. जागा मिळून एवढा मोठा कालावधी लोटल्यानंतर देखील महापालिकेने या जागेत पाण्याची टाकी उभारण्यासाठी अद्याप एकही पाऊल उचललेले नाही.

वाकड परिसरात आजमितीला मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण सोसायट्या आहेत. तसेच आणखी काही गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात या परिसराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सध्याच्या घडीला येथील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नाही. या भागात पाण्याची टाकी नसल्याने ही परिस्थिती उद्भवत आहे. येथील नागरिकांना खासगी टँकरद्वारे पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेला कर देऊनही नागरिकांना खासगी टँकरसाठी महिन्याकाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत. उन्हाळ्यात तर पिण्याच्या पाण्याची स्थिती आणखी गंभीर बनते आणि नागरिकांना नाहक पैसे खर्च करावे लागतात.

या सर्व बाबींची गंभीर दखल घेऊन महापालिका प्रशासनाने वाकडमधील सर्वे क्रमांक २०९ येथे पिण्याच्या पाण्याची टाकी उभारणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी जागा ताब्यात येऊनही प्रशासन पाण्याची टाकी उभारण्यासाठी कार्यवाही करत नसेल, तर त्याची आपण स्वतः गंभीर दखल घ्यावी. टाकी उभारण्यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत. टाकी उभारण्यासाठी प्रशासकीय अडचण असल्यास त्याबाबत संवाद साधण्यात यावा. अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. वाकड व पिंपळेनिलखमधील नागरिकांची गरज लक्षात घेऊन पाण्याची टाकी उभारण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.”