वाकडमध्ये दांडिया खेळताना महिलेचा विनयभंग, एक अटक दोघे फरार

0
1176

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – दांडिया खेळत असताना तिघा टोळक्यांनी एका महिलेची छेडछाड करुन विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.१३) रात्री नऊच्या सुमारास वाकड येथील वेणूनगरमध्ये डोंगरे कॉर्नर जवळील मोकळ्या मैदानात घडली.

याप्रकरणी पीडित २० वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार नितीन पटेकर, शाम पटेकर आणि बाळू खरात नावाच्या तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री नऊच्या सुमारास पीडित २० वर्षीय महिला वाकड येथील वेणूनगरमध्ये डोंगरे कॉर्नर जवळील मोकळ्या मैदानात दांडिया खेळण्यासाठी गेली होती. यावेळी तेथे नितीन, शाम आणि बाळू हे तिघे आरोपी उपस्थित होते. दांडिया खेळत असताना त्यांनी महिलेला धक्का देऊन, अश्लील भाषेत छेडछाड केली. यावर पीडित महिलेने आज (रविवार) सकाळी वाकड पोलीसात तिघा आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार नितीन, शाम आणि बाळू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नितीन पटेकर याला अटक केली असून शाम आणि बाळू हे दोघे फरार झाले आहेत. वाकड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.