वाकडमध्ये चाकूचा धाक दाखवून नेव्हीतील अधिकाऱ्याला लुटले

0
867

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – लिफ्ट मागत असताना दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघा चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून नेव्हीत कामाला असलेल्या इसमाकडून एक टॅबलेट फोन आणि रोख रक्कम असा एकूण ३० हजार ७०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. ही घटना बुधवारी (दि.२४) दुपारी सव्वादोनच्या सुमारास वाकड येथील मुंबई-बेंगलोर हायवे वरील हॉटेल ताजसमोर घडली.

विनायक शंकर पागावार (वय ४४, रा. ६७३/१, चुनाभट्टी कॉलनी, एनएडी करंजा, ता. उरण, जि. रायगड) असे लुटमार झालेल्या इंडीयन नेव्हीतील अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चौघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास वाकड येथील मुंबई-बेंगलोर हायवे वरील हॉटेल ताजसमोर विनायक हे लिफ्ट मागत उभे होते. यादरम्यान दोन दुचाकींवरुन आलेल्या चौघा चौरट्यांनी चाकूचा धाक दाखवून विनायक यांच्या जवळील एक टॅबलेट फोन आणि रोख रक्कम असा एकूण ३० हजार ७०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. यावर त्यांनी तातडीने हिंजवडी पोलीसात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. तर आरोपी हे १८ ते २० वयोगटातील असून त्यांनी तोंडाला बांधलेले असल्याने त्यांना ओळखता आले नाही, अशी माहिती विनायक यांनी दिली आहे. हिंजवडी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.