वाकडमध्ये गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांची तब्बल ४३ कोटींची फसवणूक

0
638

वाकड, दि. १४ (पीसीबी) – इशान आणि अंकित या दोन सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांची पाच जणांनी मिळून तब्बल ४३ कोटी २६ लाख ३२ हजार ५७० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २०१३ या कालावधीत घडली असून लेखापरीक्षनादरम्यान हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी लेखापरीक्षक राजेश सुदाम भुजबळ (वय 52) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजीव यशवंत भाले (रा, शिवाजीनगर), सुहास भालचंद्र गोसावी (रा. औंध), अंजली शशांक निवसरकर (रा. औंध), भालचंद्र चिंतामण देव (रा. वाकड), ईश्वर खुशालदास पंजाबी (लक्ष्मीरोड, पुणे) या पाच जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे ईशान आणि अंकिता अशा दोन सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. दोन्ही गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी म्हणून पाचही आरोपी काम पाहत होते. आरोपींनी आपसात संगनमत करून १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २०१३ या दरम्यान गृहनिर्माण संस्था आणि प्लॉट धारक सभासदांचा विश्वास संपादन करून ४३ कोटी २६ लाख ३२ हजार ५७० रुपयांचा अपहार केला. गृहनिर्माण संस्थांचे फेरलेखापरीक्षण केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी पाचही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.