वाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक

0
752

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – विक्रीसाठी आणलेला तब्बल १ लाख ६६ हजार रुपये किमतीचा ११ किलो ४२ ग्रॅम गांजासह एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेकडील अंमली पदार्थ विरोधी पथकाने वाकड हद्दीतील भुमकर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर डेअरी फार्म गेट नं.२ समोर केली.

गोपाल संजय माळी (वय २७, रा. गल्ली नं.१, हुडकु, शिरपुर, ता. शिरपुर, जि. धुळे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात अंमली पदार्थ तस्करी केल्या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, वाकड हद्दीतील भुमकर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर डेअरी फार्म गेट नं.२ समोर एक इसम अमली पदार्थ घेऊन येणार आहे. यावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला असता त्या ठिकाणी संशयीत इसम गोपाल हा हातात पोते घेऊन उभा असल्याचा पोलिसांना दिसला. पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊन लागला. त्याच्याजवळील पोते तपासले असता त्यामध्ये तब्बल १ लाख ६६ हजार रुपये किमतीचा ११ किलो ४२ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करुन आरोपी गोपाल याला अटक केले. त्याच्या विरोधात अंमली पदार्थ तस्करी केल्या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहे.