वसई विरार महापालिकेवर प्रशासक

0
315

वसई विरार, दि. २९ (पीसीबी) : वसई विरार महापालिकेवर आजपासून प्रशासकीय राजवट सुरु झाली आहे. 28 जून रोजी लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने महापालिकेचे प्रशासक म्हणून गंगाथरण डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव, वसई विरार नालासोपारा शहरात दरवर्षी उद्भवणारी पूरपरिस्थिती याचे नियोजन करताना प्रशासक गंगाथरण डी यांची कसोटी लागणार आहे.115 सदस्य संख्येच्या वसई विरार महापालिकेत 109 नगरसेवक असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे. मात्र या महापालिकेचा गाडा पहिल्यांदाच प्रशासक हाकणार आहे.

गेल्या तीन महिन्यापासून महापालिकेत आयुक्त आणि लोकप्रतिनिधीमध्ये खटके उडत होते. त्यामुळे प्रशासकीय काळात लोकप्रतिनिधी प्रशासनाला किती सहकार्य करणार, हा प्रश्नचिन्ह आहे. महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांची नुकतीच बदली झाली होती. खुद्द मनाळे यांची विनंती आणि प्रशासकीय कारणावरुन बदली झाल्याची चर्चा आहे.

वसई विरारमध्ये ‘कोरोना’चे संकट वाढत असताना जुन्या अधिकाऱ्यांच्या बदलीने महापालिका कामाच्या नियोजनात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. रमेश मनाळे यांना गेल्या दोन वर्षांपासून वसई विरार महापालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव होता. वसई विरार महापालिकेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि नऊपैकी चार प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त हे सर्वच नवीन आहेत. त्यामुळे कोरोना संकटात प्रशासकीय अडथळे येण्याची भीती वर्तवली जात आहे.