Maharashtra

वसंतदादा पाटील यांची नातसून राष्ट्रवादीच्या वाटेवर

By PCB Author

July 14, 2020

सांगली, दि. १४ (पीसीबी) : काँग्रेस नेत्या जयश्री पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. जयश्री पाटील या माजी मंत्री दिवंगत मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून आहेत. काँग्रेसमधील गटबाजी आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने त्यांनी निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार असल्याचे बोलले जाते. सांगली जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

जयश्री पाटील यांच्या प्रवेशाला राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरुन हिरवा कंदील मिळाल्याची माहिती आहे. जयश्री पाटील यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमधील मोठा गट राष्ट्रवादीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सांगली महापालिका, बाजार समिती, जिल्हा सहकारी बँकेमध्येही राष्ट्रवादीची ताकद वाढण्याची चिन्हे आहेत.

सांगली जिल्ह्यात काँग्रेसमध्ये मंत्री विश्वजित पतंगराव कदम आणि युवा नेते विशाल प्रकाशबापू पाटील असे दोन गट आहेत. प्रत्येक निवडणुकीत हे दोन गट कधी उघड तर कधी छुप्या पद्धतीने परस्परविरोधी काम करतात, असे म्हटले जाते.

दुसरीकडे, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. पृथ्वीराज पाटील यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं पाठबळ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मदनभाऊ पाटील गट अस्वस्थ असल्याचे बोलले जाते. भाजपसारख्या अन्य पक्षांकडे हे कार्यकर्ते जाण्याअगोदर त्यांना राष्ट्रवादीत घेऊन मोठी राजकीय खेळी राष्ट्रवादी करत असल्याचंही बोललं जातं आहे.