वल्लभनगरमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून उच्चशिक्षित महिलेची आत्महत्या

0
5179

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – सासरच्या जाचाला कंटाळून एका डी फार्मसी शिक्षण झालेल्या विवाहितेने ओढणीच्या सहायाने घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे विवाहितेला तीन महिन्यांचा मुलगा आहे. ही घटना रविवारी (दि.२) वल्लभनगर येथील तिच्या सासरच्या घरी घडली.

स्नेहा स्वरुप क्षीरसागर (वय ३१, रा. वल्लभनगर, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

मृत स्नेहाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा सासरी वल्लभनगर येथे राहत होती. स्नेहाचा पती स्वरुप हा सराफी व्यवसाय करत होता. तिला तीन महिन्यांचा मुलगा आहे. सासरकडचे लोक वारंवार तिच्याकडे पैशांसाठी तगादा लावत होते. यामुळे ती एका मेडिकलच्या दुकानात कामाला देखील जात होती. स्नेहाच्या आई-वडिलांनी कित्येकवेळा स्वरुपला पैसेही दिले होते. मात्र तरी देखील तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून किंवा सासरकडच्यांनीच तिचा घातपात केल्याचा आरोप स्नेहाच्या नातेवाईकांनी केला आहे. सध्या पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. मात्र आरोपींना अटक करु पर्यंत आम्ही स्नेहाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भुमिका मृत स्नेहाच्या नातेवाईकांनी घेतली आहे.