Maharashtra

वर्धातील दारूगोळा कारखान्यात जुने बॉम्ब निकामी करताना स्फोट; ६ ठार

By PCB Author

November 20, 2018

वर्धा, दि. २० (पीसीबी) – पुलगावातील केंद्रीय दारूगोळा भांडारात जुने बॉम्ब निकामी करताना झालेल्या मोठ्या स्फोटात सहा जण ठार झाले आहेत. तर ११ जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना आज (मंगळवारी) पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली.  या स्फोटांच्या आवाजामुळे  आजबाजूच्या  परिसरात नागरिकांमध्ये  भीतीचे वातावरण पसरले आहे. मृतांमध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरीतील दोन कर्मचाऱ्यांसह, दोन कामगाराचा समावेश आहे.

वर्धा येथील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारात भारतीय सैन्यासाठी बॉम्ब, हातबॉम्ब, अग्निबाण, दारूगोळा, अद्ययावत शस्त्रास्त्रांचा साठा करण्यात येतो. आज सकाळी मुदतबाह्य बॉम्ब निकामी केले जात होते. यादरम्यान हा स्फोट झाला.  पोलिसांनी या दुर्घटनेचा तपास सुरू केला आहे.

बॉम्ब निकामी करताना पेटी हातातून पडल्यामुळे हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. जखमींवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरु असून यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. निकामी बॉम्बचे जस्त कथिल अॅल्युमिनियम वेचण्यासाठी गावातील ग्रामस्थ फायरिंग रेंजमध्ये जातात, असे सांगितले जाते. यासाठी काही शेतमजूर तिथे गेले होते, असे समजते.