Banner News

`वर्क फ्रॉम होम` कल्चर अंगलट येऊ शकते … कोरोना आख्यान भाग ७ – अविनाश चिलेकर

By PCB Author

May 02, 2020

`वर्क फ्रॉम होम` कल्चर अंगलट येऊ शकते …

कोरोना आख्यान भाग ७ –

कोरोना मुळे देश राज्य, शहर, गाव सगळे बंद आहे. कदाचित आणखी महिना दोन महिना चालेल. त्यात उत्पादक कंपन्या बंद राहिल्या, पण आयटी कंपन्यांनी घरूनच काम पहा (`वर्क फ्रॅआम होम) सुरू ठेवले आणि काम अखंड ठेवले. माणसांचा एकमेकांशी थेट संपर्क नको म्हणून घरून कामची सवलत दिली. सरकारचे आदेश आल्याने सुमारे ६५० आयटी कंपन्या असलेले हिंजवडी, तळवडे, खराडीतील आयटी पार्क बंद राहिले. पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील पाच लाख आयटी अभियंते, कर्मचारी घरी बसले. एक चांगले झाले त्यांना घरातूनच काम पाहता येते. त्यामुळे कंपनी बंद असली तरी काम चालू, घरबसल्या पगारभत्ता सुरू राहिला. देशभर हाच ट्रेंड आहे. त्याचे फायदे आहेत आणि तोटेसुध्दा आहेत. या कंपन्यांनी शहरात सुबत्ता आणली, चारचाकी वाहनांची रेलचेल वाढवली, रिअल इस्टेटला चांगले दिलस आणले, शहराची बाजारपेठ फुलवली, प्रत्यक्ष- अप्रत्यक्षात पाच-दहा लाख रोजगार आणला. त्यामुळे हे दुकान चालले पाहिजे.

घरातून काम सुरू झाल्यापासून तीन-चार लाख चारचाकी किमान दोन लाख दुचाकी, घरपोहोच सेवा देणाऱ्या हजारो कंपनी बसेस, दहा-पंधरा हजारावर ओला-उबेर बंद राहिल्या. २०० फुटांचे रस्ते सुध्दा नदिला महापूर आल्यासारखे चार चाकी वाहनांनी भरभरून वाहत असतं, दोन दोन किलोमीटरची वाहतूक कोंडी प्रत्येक नाक्यावर असे ते चित्र संपले. प्रदुषण घटले, हवा स्वच्छ झाली. घरातून काम असल्याने कामगाराना कंपनीत द्यावे लागणारे जेवण, नाष्टासह अन्य सुविधांवरचा कोट्यवधी रुपये खर्च वाचला. अलिशान कार्यालयांसाठी ४००-५०० कोटींची इमारत किंवा भाडे, फर्निचर, प्रशासकीय अधिकार, हाऊसकिपिंग, वीजेसह अन्य खर्चाला कात्री लागली. कर्मचाऱ्यांना ये जा करण्यासाठी सवलतीत बसेस सोडाव्या लागत तो खर्च वाचला. हे सगळे पाहून आता अनेक कंपन्या म्हणू लागल्यात घरातूनच काम पाहा. टाटा कन्सल्टन्सी कंपनी (टीसीएस) ने आता ठरवले आहे की, ७५ टक्के कामगारांनी घरूनच काम पहावे. कोरोना संपला तरी सर्वसाधारण परिस्थितीतही हेच योग्य असेल असा कंपनीचा कयास आहे. या कंपनीत पुणे, बेगळुरूमध्ये मिळून जवळपास साडेचार लाख कामगार आहेत. पुढचे दोन वर्षे अशाच पध्दतीने कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा त्यांनी दिली. याची कारणेही तशीच आहेत. टीसीएसचा हा प्रयोग पूर्ण आयटीचे कल्चरला नवीन कलाटणी (गेम चेंजर) देणारा आहे. विशेषतः महिलांसाठी ही पध्दत अत्यंत फायदाची आहे. हाच प्रयोग आता अन्य आयटी कंपन्यांच्या पसंतीला उतरला तर पुढचे चित्र काय असेल त्याची कल्पना करा.

घराचेच कार्यालय झाले तर चालेल का. घर घर पाहिजे. घराच घरपण कायम राहिले पाहिजे. जे कार्यालयातील वातावरण असते ते घरात तुर्तास ठिक, पण कायम स्वरुपी नसावे. त्यातून घराचे घरपण संपेल. कैटुंबिक स्वास्थ, कुटुंब व्यवस्थासुध्दा धोक्यात येऊ शकते. आयटी वर आधारीत जे जे उद्योग हिंजवडी परिसरात आहेत त्यांचे काय होणार. मोठ मोठी तारांकीत हाटेलांवर संकट येईल. मात्र केटरींग, झोमॅटो, स्विगी यांचा धंदा वाढेल. घरून काम कल्चर डेव्हलप झाले तर एक मोठा धोका संभवतो.

आता तर २०२५ पर्यंत ९० टक्के काम घरून पाहण्याची पध्दत कायम रूढ करण्याचा प्रस्ताव काही कंपन्यांचा आहे. त्यात अप्रत्यक्षात कोट्यवधी लोकांचा रोजगार बुडेल. अमेरिकेत दोन कोटी लोकांचा रोजगार या पध्दतीमुळे गेला असे एक अहवाल सांगतो. कोरोना आणखी कोणाचे बळी घेणार कोणाचे सोनं करणार त्याचे उत्तर काळ देईल.