Desh

वरिष्ठ पत्रकार रविश कुमार अखेर NDTV इंडिया वृत्तवाहिनीतून बाहेर.

By PCB Author

December 01, 2022

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) : वरिष्ठ पत्रकार रविश कुमार यांनी अखेर NDTV इंडिया या वृत्तवाहिनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून वरिष्ठ कार्यकारी संपादकपदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीनं देखील त्यांचा राजीनामा स्विकारला असून तो तात्काळ प्रभावानं लागू होईल असं सांगितलं आहे.

NDTVच्या कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या अतंर्गत ईमेलवरमध्ये रविश कुमार यांच्या राजीनामा तात्काळ प्रभावानं मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. रविश कुमार हे अनेक दशकांपासून NDTVचा अविभाज्य भाग बनले होते. NDTVमध्ये रविश कुमार अनेक कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत होते. यांमध्ये आठवड्याचा शो हमलोग, रविश की रिपोर्ट, देश की बात आणि प्राईम टाईम या कार्यक्रमांचा समावेश होता.

तळागळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न पोटतिडकीनं मांडण्याासाठी रविश कुमार ओळखले जातात. पत्रकारितेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना दोनदा प्रतिष्ठित रामनाथ गोयंका एक्सलेन्स इन जर्नालिझम अॅवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच आशियातील नोबेल पुरस्कार मानल्या जाणाऱ्या रॅमन मॅगेसेसे पुरस्कारानं त्यांना सन २०१९ मध्ये सन्मानितही करण्यात आलं आहे.

NDTV चे प्रवर्तक आणि संचालक प्रणय रॉय (Prannoy Roy) आणि राधिका रॉय यांनी (Radhika Roy) यांनी नुकताच आपल्या पदांचा राजीनामा दिला. कंपनीकडूनही दोघांचे राजीनामे तात्काळ मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर सुदिप्त भट्टाचार्य, संजय पुगलिया आणि संथिल समिया चंगलवारयान यांना तत्काळ NDTVचं संचालक बनवण्यात आलं. आरआरपीआर होल्डिंगच्या शेअर्सच्या हस्तांतरणामुळं अदानी समूहाला (Adani Group) एनडीटीव्हीमध्ये 29.18 टक्के हिस्सा मिळणार आहे. यांसह अदानी समूहाकडून 5 डिसेंबरला अतिरिक्त 26 टक्के समभागासाठी खुली ऑफर दिली आहे.