वन खात्याचे नाव बदलून शिकारी खाते करा – आदित्य ठाकरे

0
459

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – अवनी किंवा टी-१ या वाघिणीला मारताना नियमांचा अवलंब योग्य प्रकारे केला गेला नसल्याचा संशय वन्यजीव प्रेमींकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, टी-वन वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनीही वन मंत्रालयावर टीका केली आहे. वन खात्याचे नाव बदलून शिकारी खाते असे करायला हवे, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

न्यायालयाकडून वाघिणीला मारण्याची परवानगी होती का? तिला बेशुद्ध करून पकडता आले नसते का? एक वन्यजीवप्रेमी म्हणून आपल्याला पडलेले हे प्रश्न आहेत. मात्र आज अवनीला ठार केले. उद्या तिच्या बछड्यांचा किंवा आणखी दुसऱ्या वाघाचा बळी घेतला जाईल, असा असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, दहशत निर्माण करणाऱ्या यवतमाळच्या वाघिणीला शुक्रवारी रात्री वन विभागाच्या पथकाने ठार मारले. या वाघिणीला आधी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तिने चमूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने तिला गोळी घालण्यात आली. वन विभागाने दिलेल्या या माहितीवर संशय उपस्थित करण्यात येत आहेत. बेशुद्ध करण्याचे प्रयत्न न करता थेट तिला गोळी घालण्यात आली आणि त्यानंतर केवळ छायाचित्रासाठी या वाघिणीला डार्ट लावण्यात आला असा संशय वन्यप्रेमी व्यक्त करीत आहेत. अवनी वाघिणीच्या मृत्युची बातमी आली त्या क्षणापासून वन्यजीवप्रेमींच्या विविध सोशल ग्रुप्स या प्रकियेबाबत संशय व्यक्त करणे सुरू झाले होते. शुक्रवारी रात्री वाघिणीला ठार मारताना कुणीही पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे, नियमांचे उल्लंघन करून ही वाघिणीला ठार मारण्यात आल्याचे आरोप मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत, तर वन्यजीव प्रेमिंकडून घेतलेले आक्षेप वन विभागाने फेटाळून लावले आहेत.