वडेट्टीवार यांनी महाज्योती संस्थेची येड्याची जत्रा आणि खुळ्यांची चावडी केली; भाजपनेत्याची खोचक टिका

0
385

सांगली,दि.११(पीसीबी) – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर महाज्योती संस्थेतील कारभारावरून निशाणा साधला आहे. वडेट्टीवार यांनी महाज्योती संस्थेची येड्याची जत्रा आणि खुळ्यांची चावडी केली आहे, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. गोपीचंद पडळकर यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी आपल्या गलथान कारभारामुळे ओबीसी व भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी असणाऱ्या ‘महाज्योती’ संस्थेला ‘येड्याची जत्रा अन खुळ्याची चावडी’ करून टाकली आहे, असं सांगतानाच पडळकर यांनी यूपीएससी परीक्षेवरूनही वडेट्टीवारांवर जोरदार हल्ला चढवला आहे.

वडेट्टीवार यांनी प्रस्थापितांना मुजरा करत ओबीसी व भटक्या विमुक्त जाती यांचा छळ करण्याचा जणू काही विडाच उचलला आहे. या मालिकेत आता MPSC – UPSC विद्यार्थ्यांच्या भविष्याचा कडलोट होतोय. काल कुठलीही पुर्वसूचना न देता 13 सप्टेंबरला अचानकपणे UPSC चाळणी परीक्षेचे आयोजन केले आहे. आता तीन दिवसात विद्यार्थी येणार कधी? परीक्षा देणार कधी? UPSC चे उमेदवार दिल्ली येथे तयारी करण्यासाठी गेलेले असतात. काहींची 10 ऑक्टोबरला पूर्व परीक्षा आहे, तर काहींच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखती आहेत, असं त्यांनी सांगितलं. चाळणी परीक्षा तुम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा करून पुर्ननियोजीत केली नाहीतर आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही. तसा माझा या प्रस्थापित सरकारला इशाराच आहे, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, पडळकर आणि वडेट्टीवार यांच्या गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक वॉर सुरू आहे. वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा दावा पडळकर यांनी केला होता. पडळकरांच्या या आरोपावर वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. बाबा रे तुला काय बोलायचं असेल तर पुराव्यानिशी बोल. बेछूटपणे काही आरोप करू नकोस. खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध कर. नाही तर आज तुला नोटीस देणार आहेच. हे माझं ठरेललं आहे, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला होता पडळकरांवर 50 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं.

पडळकरांनी ऐकिव गोष्टीवर आरोप करू नये. वास्तव गोष्टींवर आरोप करावेत. आता ते कार्यकर्ते राहिले नाहीत. आमदार झाले आहेत. एखाद्या मंत्र्यावर जबाबदारीने आरोप केले पाहिजेत. माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. कोणत्या ठिकाणी ही फॅक्ट्री आहे हे त्यांनी सांगावं. पत्ता काढावा. कोणत्या नातेवाईकाची आहे हे सांगावं. नाही सांगितलं तर मी अब्रुनुकसानीचा दावा करेन. कोर्टात जाईल. माझी कोणत्याही दुकानात भागिदारी नाही. असेल तर पुराव्यानिशी सिद्ध करावी, असं वडेट्टीवार म्हणाले होते.