वडिलोपार्जित जमिनीवरून भावकीत वाद; परस्पर विरोधात गुन्हा दाखल

0
344

तळेगाव दाभाडे, दि. १७ (पीसीबी) – वडिलोपार्जित जमिनीच्या कारणावरून भावकीतील दोन गटात वाद झाला. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 16) सकाळी मावळ तालुक्यातील चांदखेड गावात घडली.

मनीषा विठ्ठल गायकवाड (वय 45, रा. चांदखेड, ता. मावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महेश अशोक गायकवाड (वय 36), अशोक बाळा गायकवाड, अंजना अशोक गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा दीर किरण शामराव गायकवाड हे दुचाकीवरून घरी येत असता आरोपींनी फिर्यादी यांच्या घराच्या पाठीमागे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वडिलोपार्जित जागेच्या वादातून फिर्यादी यांच्या दिराच्या गाडीवर लाथ मारली. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी यांचे पती आणि दीर गेले असता आरोपींनी फिर्यादी, त्यांचे पती आणि दीर यांना मारहाण केली. तसेच शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याच्या परस्पर विरोधात महेश अशोक गायकवाड (वय 35, रा. चांदखेड, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्तात्रय शांताराम गायकवाड (वय 52), अरुण शामराव गायकवाड (वय 48), लखन वाल्मिक गायकवाड (वय 33) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराच्या पाठीमागे वडिलोपार्जित जागेच्या वादातून आरोपींनी फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांच्या आईला झटापटीत ढकलून देऊन शिवीगाळ केली. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.