Maharashtra

वडिलांची आठवण आल्यावर दोन शब्द पण बोलायचे नाही का ? – पंकजा मुंडे

By PCB Author

September 22, 2019

मुंबई, दि.२२ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय नेते आता तयारीला लागलेले आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे विरुद्ध भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे असा सामना रंगणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील चुरस नेहमीप्रमाणे वाढली आहे.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे या सहानुभूतीच्या नावाखाली मतं मागतात असा आरोप करत आहेत. याला पंकज मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी एखाद्या मुलीचे वडील वारल्यानंतर तिनं काय हसत, ढोलताशे वाजवत मैदानात उतरायचं का? आठवण आल्यावर दोन शब्द बोलायचे नाही का ? असा प्रश्न धनंजय मुंडेंना विचारला आहे.

तसेच पुढे बोलताना पंकजा मुंडे यांनी ‘सहानुभूती घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, जनतेची सहानुभूती आहेच. सहानुभूती त्यांनाच मिळते ज्यांचे जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध असतात असंही विधान केले आहे. त्यामुळे भाऊ बहिणीमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. पंकजा मुंडेंच्या या विधानावर धनंजय मुंडे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, पुढे बोलताना पंकजा यांनी ‘धनंजय मुंडेंच्या कुठल्याच विधानाला मी गांभीर्याने घेतलं नाही. आरोप करणं हा त्यांचा अजेंडा एकच होता, तो त्यांनी पाच वर्ष चांगला निभावला. धनंजय मुंडे यांचंही भाषण मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. मुंडेसाहेब जिवंत असताना धनंजय मुंडे आग ओकत असत अस विधान केले आहे.