Banner News

वडापावच्या हातगाड्यांवरून युवकाच्या खून प्रकरणात काळेवाडीतील भाजप नगरसेविकेच्या मुलासह पाच जणांना अटक

By PCB Author

August 20, 2020

पिंपरी, दि. २० (पीसीब) – वडापावच्या हातगाड्यांवरून काळेवाडी-वाकड येथे पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करत खून करण्यात आला. या प्रकरणी काळेवाडीतील भाजप नगरसेविकेच्या मुलासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील पाच जणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

राज हेमंत तापकीर, ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील (वय 23), प्रवीण ज्योतीराम धुमाळ (वय 21), अविनाश धनराज भंडारे (वय 23), अजय भारत वाकोडे (वय 23) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह मोरेश्वर रमेश आष्टे (वय 21), प्रेम वाघमारे (सर्व रा. काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम जनार्दन नखाते (वय 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शुभमचे वडील जनार्दन आत्माराम नखाते (वय 52, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसापूर्वी वडापावच्या गाड्यावरून मयत शुभम आणि आरोपी ज्ञानेश्वर पाटील यांच्यामध्ये भांडण झाले होते. ते भांडण मिटविण्यासाठी आरोपींनी मयत शुभम याला थेरगाव येथील धोंडीराज मंगल कार्यालयात बोलावून घेतले.

सर्व आरोपींनी शुभमच्या डोक्यात, चेह-यावर, हातावर कोयत्याने वार केले. त्यातच शुभमचा मृत्यू झाला. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. अन्य दोन आरोपींच्या मागावर पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.