Lifestyle

‘वडापाव’चा असा चवदार प्रवास; जो सातासमुद्रापार वाजवतोय डंका; ‘वडापाव’ जन्माची हि गोष्ट माहितीये…

By PCB Author

January 05, 2021

वडापाव म्हंटल कि आहाहाहा !! तोंडाला पाणीच सुटत राव. आणि जर का वडापाव सोबत तळलेली खुसखुशीत हिरवी मिरची आणि सोबत लसणाची किंवा खोबऱ्याची चटणी असेल तर विषय संपलाच समजा… पोटात कावळे कावकाव करायला लागतात. कारण वडापावचा ‘स्वैग’ च वेगळा असतो. अनेक जण आपल्या नाष्टा किंवा जेवणाची भूक भागवण्यासाठी वडापाव वरती निर्भर असतात. आज वडा पाव फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगात आपली सत्ता गाजवत आहे. मात्र महाराष्ट्रीयन लोकांशिवाय वडापावचे महत्व इतर कोणालाही समजणार नाही हेही तितकंच खरचं. मात्र या वडापावचा जन्म नक्की कुठे , कसा आणि का झाला असेल बरं?? जो आज मॅक-डोनाल्ड्स, बर्गरला सुद्धा तगडी टक्कर देतोय. ज्याने फक्त महाराष्ट्रातच नाही तर लंडन प्रयन्त आपली मजल मारलीय…पण कशी माहितीये…

दादर स्टेशनबाहेर अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर १९६६ साली वडापावचा जन्म झाला असं म्हणतात. आणि याच काळात दादरमध्येच सुधाकर म्हात्रेंचा वडापावही सुरू झाल्याचं जुने मुंबईकर स्पष्ट करतात. केवळ बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्यापेक्षा बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात घोळवत ते तेलात खरपूस तळून बटाटेवडे बनवायला सुरूवात झाली. जेव्हा वडापाव नवीन नवीन तयार झाला, त्यावेळी त्याची फक्त १० पैशाला विक्री व्हायची. जी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी असायची.

मात्र आज अगदी ५ रुपयांपासून मॉलमध्ये ८० ते १०० रुपयांपर्यंत वडापाव मिळतो. आज दिवसरात्र कुठेही मिळणारा वडापाव सुरुवातीला केवळ सहा ते सात तास मिळायचा. दुपारी भर उन्हात दोनच्या सुमारास गाडी लागायची आणि आठ-साडेआठ पर्यंत ती गाडी सुरु असायची. दादर, परळ, गिरगावमध्ये मराठी उपाहारगृहांची संख्या वाढल्यानंतर तिथे बटाटावड्याला हक्काचं घर मिळालं. हक्काची ओळख मिळाली. सुरुवातीला फक्त बटाटावडा खाल्ला जायचा. मात्र त्याला पावाने खूप नंतर पासून साथ दिली. वडापावला खरी ओळख दिली ती मुंबई आणि मुंबईकरांनी. त्यावेळी तर गिरणी कामगारांनी या मराठमोळ्या पदार्थाला चांगलेच डोक्यावर उचलून धरले.

मात्र पुढे १९७० ते १९८० च्या काळात मुंबईतील गिरण्या बंद पडू लागल्या तसे अनेक तरुण वडापावच्या गाडीकडे रोजगाराचे आणि आपलं पोटापाण्याचा साधन म्हणून पाहू लागले. त्यानंतरच हळूहळू गल्लोगल्ली वडापावच्या गाड्या दिसायला लागल्या. मुंबईतल्या मराठी मुलांच्या या धडपडीला शिवसेनेने मात्र खंबीरपणे भरघोस पाठिंबा दिला. ‘मराठी माणसाने उद्योगात उतरावे’ या मताचे बाळासाहेब ठाकरे हे कायमच होते. त्यामुळेच वडापावच्या गाड्या म्हणजे सुरु केलेले छोटा उद्योगच होता. मात्र त्याचवेळी शिवसेनेने वडापाव प्रमोट कऱण्यास सुरुवात केली. सेनेने दक्षिण भारतीयांविरुद्ध भूमिका घेतल्याने मुंबईमधील दादर, माटुंग्यासारख्या परिसरामध्ये असणाऱ्या उडपी हॉटेल्समधील दाक्षिणात्य खाद्यपदार्थांना विरोध करण्यासाठी वडापाव पुढे आला.

‘उडप्यांचे पदार्थ खाण्याऐवजी आपला मराठमोळा वडापाव खा’, अस धोरण हाती घेत सेनेने एकाप्रकारे वडापावचे राजकीय स्तरावर ब्रॅण्डींगच केले. आणि याच धोरणातून आणि राजकीय स्तरातून मिळालेल्या पाठिंब्यामुळे ‘शिववडा’ जन्माला आला. वडापावला राजकीय पाठबळ देत महानगरपालिकेमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेने अगदी वडापावच्या गाड्या टाकण्यापर्यंतचे नियम बनवले. आणि हळूहळू शाळांपासून ते मोठमोठ्या ऑफिसच्या आज अनेक ऑफिसेसच्या कॅन्टीनमध्ये वडापावने आपले स्थान भक्कम केले. जसा काळ बदलत गेला तशी स्पर्धा वाढत गेली. त्यामुळे मुंबईमध्ये वडापावचे वेगवेगळे प्रकार मिळू लागले. म्हणजेच कॉलेजबाहेरच्या वडापाववाल्याने वड्याबरोबर आता वडापावसोबत हळूहळू बेसनाचा चुरा देण्यास सुरुवात केली.

असा हा वडापावचा चवदार प्रवास जो मुंबईमधून सुरु झाला खरा आणि आज तोच प्रवास सातासमुद्रापार आपलं वेगळं स्थान परदेशातसुद्धा निर्माण करत भक्कमपणे उभा आहे…परदेशी स्थयिक आपले भारतीय बांधव, भगिनी वडापावची चव तेथील लोकांना सुद्धा चाखायला भाग पडतात. एकूणच काय तर तयार करण्याची पद्धत तीच फक्त नाव, रंग, रूप आणि अस्सल चव जरी बदलली असली तरी ‘मॅक्डोनाल्ड्स’ आणि ‘बर्गरकिंग’ वरती आपला वडापाव जाम भारी पडतोय हे मात्र खरंय…