वडगाव मावळ मध्ये बेवारस वाहनामुळे वाहतूक कोंडी; प्रशासनाचे दुर्लक्ष

0
617

वडगाव,दि.३(पीसीबी) – तालुक्याचे गाव असणाऱ्या वडगाव मावळ मधील पंचायत समितीच्या इमारती समोरच एक अज्ञात वाहन गेले चार दिवस रस्त्याच्या मधोमध पडून आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या वाहनाचे पुढील एक चाक मोडले असून या वाहनाची अवस्था खराब झाली आहे. त्यामुळे हे वाहन वडगाव स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध अनेक दिवसांपासून पडून आहे. यामुळे रेल्वे स्टेशन कडे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे.

स्टेशन रोड परिसरात अनेक शासकीय कामे होत असतात, त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची वर्दळ नेहमीच असते परंतु या वाहनाच्या अडचणी मुळे या ठिकाणी काही प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

मावळ पंचायत समिती शेजारीच असणाऱ्या वडगाव स्टेशन रोडवर हे वाहन अनेक दिवस असेच पडून आहे पण अजूनही पोलीस प्रशासनाने तसेच नगरपंचायतीच्या वतीने या वाहनावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

दरम्यान, लवकरात लवकर या वाहनाला रस्त्यावरून बाजूला करावे आणि येण्याजाण्याचा मार्ग सुरळीत करावा अशी स्थानिकांची प्रशासनाला विनंती आहे.