वटपौर्णिमेच्या आधी केली वडाच्या झाडांची सेवा

0
225
सावित्रीच्या लेकींचा मंच आणि दिलासा संस्थेचा उपक्रम
पिंपरी, दि. २१ (पीसीबी) वृक्षसंवर्धन करणे ही आजची खरी गरज आहे. याचे महत्त्व जाणून वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या झाडाला गतवर्षी महिलांनी मनोभावे बांधलेले धागे जे अद्याप कोणी काढलेच नाहीत ते काढून आणि झाडांना बळकटी यावी म्हणून त्या वडाच्या झाडांना काऊ आणि चुना लावून वडाची झाडे आणि तिथला परिसर स्वच्छ  करण्याचा अभिनव उपक्रम वटपौर्णिमेआधी पिंपळेगुरव येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात सावित्रीच्या लेकींचा मंच आणि दिलासा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ प्रभागचे अध्यक्ष नगरसेवक सागर आंगोळकर, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, सावित्रीच्या लेकींचा मंचच्या उपाध्यक्ष मधुश्री ओव्हाळ, जयश्री गुमास्ते, संगीता झिंजुरके, दिलासा संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, पर्यावरणप्रेमी तानाजी एकोंडे, मुरलीधर दळवी, शामराव सरकाळे, शरद शेजवळ, निशिकांत गुमास्ते, चैताली चव्हाण, स्टेला गायकवाड यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. याप्रसंगी सावित्रीच्या लेकींचा मंचच्या अध्यक्ष रविना आंगोळकर म्हणाल्या, “कोणताही सण उत्सव आला की आपण आपल्या घराला रंगरंगोटी करतो, घराची साफसफाई करतो. म्हणूनच वडाच्या झाडांची सेवा वटपौर्णिमेनिमित्त कार्यकर्त्यांनी मनोभावे केली आहे, याचा आनंद वाटतो. यानिमित्त वडाच्या झाडाला लावलेल्या जाहिराती काढल्या आहेत. नागरिकांनी परिसरातील कोणत्याही झाडांना जाहिराती लावू नयेत!” असे आवाहन रविना आंगोळकर  यांनी यावेळी केले.