Desh

‘वंदे मातरम म्हणा नाहीतर चालते व्हा’ – मंत्री प्रताप सारंगी

By PCB Author

September 22, 2019

नवी दिल्ली, दि.२२ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे राम मंदिरांच्या मुद्द्यावरून वाचाळवीरांना आपले तोंड बंद ठेवण्याचा सल्ला देत असले तरी वंदे मातरम म्हणण्याच्या मुद्यावरून मात्र मोदींचे मंत्री अकलेचे तारे तोडत आहेत. ज्या लोकांना वंदे मातरम म्हणणे मान्य नाही, अशा लोकांना भारतात राहण्याचा अधिकार नाही, असे केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी म्हटले आहे. मोदी सरकारमध्ये पशुपालन राज्यमंत्री असलेल्या प्रताप सारंगी यांनी कलम ३७० बाबत आयोजित जनजागृती सभेत हे वक्तव्य केले आहे.

सभेला संबोधित करताना कलम ३७० हटवण्याचा निर्णयाला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षावरही सारंगी यांनी जोरदार टीका केली. प्रताप सारंगी म्हणाले, ”जेव्हा भाजपाच्या विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले तेव्हा काँग्रेसने मात्र त्यावर आक्षेप घेतला होता. आता अमित शहांनी तर पाकिस्तानने बळकावलेले काश्मीरसुद्धा भारताचा भाग, असल्याचे काँग्रेस नेत्यांना ठणकावून सांगितले आहे.”

दरम्यान, राम मंदिरावरून मोदींनी वाचाळवीरांचाही समाचार घेतला होता. मात्र मोदींचे हे टोले अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला असल्याचं म्हंटल जात आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना 370 प्रमाणेच आता सरकारनं राम मंदिराचा निर्णय घ्यावा असं म्हटलं होतं. त्यावरून काही नेत्यांनी राम मंदिराबाबत बरळायला सुरवात केली होती.

यावर आज मोदींनी भाष्य केले आहे. देशात वाचाळवीरांचा सुळसुळाट झाला आहे. राम मंदिराबाबत चुकीची वक्तव्य करत आहेत. राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. सर्वोच्च न्यायालयात त्या सबंधित प्रक्रिया सुरु आहे. तरीदेखील वाचाळवीर आपली भूमिका मांडत आहेत. त्यामुळे न्यायालयाचा अपमान होत आहे. आपला सर्वांचा न्यायालयावर विश्वास पाहिजे. त्याचा सन्मान केला पाहिजे. त्यामुळे माझी वाचाळ वीरांना विनंती आहे की, राम मंदिराबाबत चुकीची माहिती आणि भूमिका मांडू नका, असे मोदी म्हणाले होते.