Maharashtra

वंचित बहुजन आघाडीकडून स्वबळाची तयारी?

By PCB Author

August 21, 2019

औरंगाबाद, दि. २१ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जागा वाटपावरून दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडतांना दिसून येत आहेत. एमआयएमकडून सतत बदलणारे विधान लक्षात घेऊन वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळाच्या दृष्टीने व्यूव्हरचना आखण्यास सुरुवात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत अकोला, सोलापूरमध्ये वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना एमआयएमकडून जशी मदत मिळायला हवी तशी मिळाली नाही, तेव्हापासून दोन्ही पक्षांतील संबंध ताणत चालले आहे. या दुराव्यात तेल ओतण्याचे काम अलीकडे एमआयएमकडून झाले. औरंगाबाद शहरातील तिन्ही मतदारसंघांवर एमआयएमने दावा ठोकला. दुसऱ्याच दिवशी वंचितच्या स्थानिक नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त करीत जागा वाटपाचा अंतिम निर्णय खा. असदोद्दीन ओवेसी, प्रकाश आंबेडकर दोघे घेतील. इतर कोणीही यात हस्तक्षेप करू नये, अशी प्रतिक्रिया दिली.

एकीकडे जागा वाटपावरून दोन्ही पक्षांतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत असताना प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम मतदान एमआयएममुळे पडत नाही, मुस्लिम धर्मगुरू जे सांगतील तेच होते, असे विधान केले. औरंगाबाद शहरातील काही मुस्लिम धर्मगुरूंची भेटही त्यांनी घेतली.