लोणीकंद येथील डोंगरागावमध्ये दरोडेखोरांच्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

0
482

लोणीकंद, दि. १८ (पीसीबी) – लोणीकंद येथील डोंगरागावमध्ये दरोडेखोरांनी एका ज्येष्ठ नागरिकावर हल्ला चडवत त्यांचा खून केला. तसेच त्यांच्या पत्नीलाही गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (१७) रात्री उशीरा दीडच्या सुमारास घडली.

केरबा भिवा गडदे (वय ६२, रा. डोंगरागाव) असे मयत ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. तर त्यांची पत्नी मुक्ताबाई केरबा गडदे (वय ६१) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी त्यांची सून निर्मला अशोक गडदे (वय ३०, डोंगरागाव) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशीरा दीडच्या सुमारास फिर्यादी निर्मला या त्यांच्या सासू आणि सासऱ्यांसोबत डोंगरागाव येथील त्यांच्या घरात झोपल्या होत्या. त्यावेळी तिघा चोरट्यांनी मिळून गडदे कुटूंबीयांवर हल्ला केला. या हल्ल्यात केरबा गडदे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुक्ताबाई यांच्या गळ्यातील मंगळसुत्र आणि नाकातील नथ हिसकावून घेताना मुक्ताबाई यांनी चोरट्यांचा प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात जोरदार घाव घातला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. सासू-सासऱ्यांचा आवाज ऐकूण निर्मला बाहेर पळत आल्या असता तिघा आरोपींनी पळ काढला.

दरम्यान, पोलिस तपासात हल्लेखोर आरोपी हे दोन दिवसांपूर्वी  डोंगरागावात संशयितरित्या फिरताना दिसले होते. लोणीकंद पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.