लोणावळ्यात दारू पार्टीवर छापा, सात पर्यटकांवर गुन्हा

0
227

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) : लोणावळ्यात विनापरवाना येणारे पर्यटक पोलिसांची नजर चुकवून थेट फार्म हाऊस, रो हाऊस गाठतायेत. त्यामुळे आता पोलिसांनी त्याठिकाणी छापे टाकत कारवाई करायला सुरुवात केलीये. सोमवारी रात्री अकरा वाजता गोल्ड व्हॅली येथील माउंट कॉटेज बंगल्यावर पोलिसांनी धाड टाकत सात पर्यटकांना ताब्यात घेतलं. तर बंगल्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबईहून दोन रिक्षात हे सात पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले होते. पोलिसांची नजर चुकवत त्यांनी गोल्ड व्हॅली गाठली आणि नंतर माउंट कॉटेज बंगल्यात प्रवेश केला. सोमवारी सायंकाळी आलेल्या या महाभागांनी नंतर पार्टी सुरू केली. दारूच्या बाटल्या ही फुटल्या. बाहेर पोलिसांचं पेट्रोलिंग सुरूच होतं, तेंव्हा बाहेरील दोन रिक्षा आढळल्या. रात्रीची वेळ असल्याने पोलिसांनी जवळ जाऊन पाहिलं असता एमएच 43 अर्थात मुंबईच्या वाशीतील रिक्षा असल्याचं निष्पन्न झालं. पार्टीत दंग असणाऱ्या महाभागांना बाहेर पोलीस आल्याचा थांगपत्ता ही नव्हता. पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांना वरिष्ठांना कल्पना दिली. ते घटनास्थळी पोहचताच या पर्यटकांचं बिंग फुटलं. कोरोनामुळे पर्यटनाला बंदी असताना ही, हे सात पर्यटक विनापरवाना शहरात आल्याचं निष्पन्न झालं. तर पर्यटन बंदी असताना माउंट कॉटेज बंगला भाड्याने दिल्याने मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर सात पर्यटकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळी अद्याप ही बंदी आहे. तरी ही पुण्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळ्यात पर्यटकांचा मुक्त संचार दिसून येतोय. भुशी धरण, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंटसह विविध पॉइंटवर विनापरवाना पर्यटकांची गर्दी दिसून येत होती. वर विनामास्क फिरत सोशल डिस्टन्सिंगचा ही फज्जा उडवू लागले. त्यामुळे अशा पर्यटकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. शिवाय पुणे-मुंबईहून विनापरवाना लोणावळ्यात येणाऱ्यांना चांगलीच तंबी दिली. त्यानंतर काही दिवस पर्यटकांनी लोणावळ्यात जाणं टाळलं. पण कालांतराने काही महाभाग पुन्हा वर तोंड करून लोणावळ्यात वावरू लागले.

पर्यटन बंदीचा कायदा मोडणाऱ्या 300 हून अधिक महाभागांवर पोलिसांनी आत्तापर्यंत गुन्हे दाखल केलेत, तर विनामास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवणाऱ्या 589 पर्यकटांवरही कारवाईचा बडगा उगरण्यात आलाय. पैकी 270 खटल्यात मावळ न्यायालयाने 2 लाख 63 हजरांचा दंड ठोठावला आहे. बाहेर भटकल्यानंतर पोलीस कारवाई करतायेत म्हणून पर्यटक थेट फार्म हाऊस अथवा रो हाऊस गाठू लागले. पण या पर्यटकांना हेही महागात पडलं. कारण पोलिसांनी आता अशा ठिकाणीही धाडी टाकत कारवाईला सुरुवात केलीय. सोमवारच्या रात्री माउंट कॉटेज बंगल्यावर झालेली कारवाई करत पोलिसांनी पर्यटकांना थेट इशाराच दिलाय.

पाऊस जोर धरू लागलाय, त्यामुळे पुणे-मुंबईतील पर्यटक पर्यटनस्थळी येण्याचे नियोजन करतायेत. त्यांनी लोणावळ्यात येण्याची चूक करू नये. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनावर बंदी आहे. ही बंदी झुगारून तुम्ही आलात तर तुमच्यावर खटले दाखल केले जातील. त्यामुळे घरीच सुरक्षित रहा, असं आवाहन लोणावळा पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी केलंय.