Pune Gramin

लोणावळ्यातील दोघा सराईत चोरट्यांना २९ हजारांच्या ऐवजासह अटक

By PCB Author

May 16, 2019

लोणावळा, दि. १६ (पीसीबी) – लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरात चोऱ्या करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी २९ हजारांच्या ऐवजासह अटक केली.

वसीम रुबाबअली शेख (वय २३, रा. न्यु तुंगार्ली रोड, इंदिरानगर, लोणावळा) आणि रवींद्र दशरथ कालेकर (वय २७, रा. वळकाईवाडी, कुसगाव, ता.मावळ) असे अटक करण्यात आलेल्या दोघा सराईतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दि.७ मे रोजी लोणावळ्यात एक घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी बंद रुमच्या बाथरूममधून घरात प्रवेश केला. घरातून सोन्याची अंगठी, चेन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ५४ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लोणावळा शहर पोलिसांसोबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने देखील या गुन्ह्याचा समांतर तपास केला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार वसीम याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २९ हजारांचा ऐवज जप्त केला. तसेच वसीम याने यापूर्वी लोणावळा शहरात दोन आणि लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडी केल्याचे सांगितले. या कारवाईमुळे लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील दोन आणि लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील एक असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.