लोणावळा; नवीन वर्षानिमित्त मद्यपान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई, पोलिसांची लोणावळ्यात करडी नजर

0
588
संग्रहित

लोणावळा, दि.२९ (पीसीबी) – लोणावळा आणि खंडाळा येथे नवीन वर्षाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. नवीन वर्ष म्हटले की पार्टी, मद्यपान, दंगा मस्ती, हुल्लडबाजी या सर्व गोष्टी आल्या. परंतु, तुम्ही सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून हुल्लडबाजी केली तर लोणावळा शहर पोलीस तुमच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत. लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे हुल्लडबाजीवर याचा थेट परिणाम होणार आहे. कायद्याच्या चौकटीत राहून नवीन वर्षाचा पर्यटकांनी आनंद लुटावा असे आवाहन लोणावळा शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी केले आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी ऐकूण सहा पथके तयार केली आहेत, त्यांची नजर पर्यटकांवर असणार आहे. तुंगार्ली, खंडाळा, गावठाण, वलवन, रायवूड, टायगर पॉईंट, भुशी धरण, या महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी ही पथके तैनात असणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांवर विशेष नजर असणार आहे. मोठ्या प्रमाणावर मद्यपान विक्री होणाऱ्या दुकानावरही पोलीस लक्ष ठेवणार असून संशयास्पद आढळणाऱ्या व्यक्तीची ब्रेथ अॅनालायझरने तपासणी करण्यात येणार आहे. ज्यामुळे त्या व्यक्तीने मद्यपान केले की नाही हे स्पष्ट होणार आहे. तसेच नवीन वर्षांच्या अनुषंगाने चेक पॉईंट उभारण्यात आले आहेत, नाकाबंदीही केलेली आहे.