Pune

लोकांच्या प्रश्नावरून लक्ष वळवण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा उचलला; शरद पवारांचा शिवसेना-भाजपवर निशाणा

By PCB Author

November 26, 2018

पुणे, दि. २६ (पीसीबी) – राज्यात दुष्काळाने होरपळणाऱ्या  शेतकऱ्यांना  मदत करण्याचे सोडून भाजप-शिवसेनेने राम मंदिर आणि अयोध्येचा प्रश्न समोर आणला आहे. लोकांच्या प्रश्नावरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी या दोन्ही पक्षांनी मंदिराचा मुद्दा  उचलून धरला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष  शरद पवार यांनी आज (सोमवार) येथे केली.

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने संविधान स्तंभ लोकार्पण सोहळा  शरद पवार आणि ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्या उपस्थिती मध्ये  पार पडला. यावेळी पवार बोलत होते.

पवार म्हणाले की,  रामाच्या मूर्तीची उंची किती असावी? यावर राज्याच्या मुख्यमंत्र्याना सविस्तर चर्चा करायची आहे, मग जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे आहे का? असाही सवाल पवारांनी  केला.  भाजपच्या एका नेत्याने संविधान बदलण्याची भाषा केली आहे. यामधून त्यांचा मूठभर लोकांच्या हातात सत्ता देण्याचा डाव दिसून येत आहे. परंतु हा डाव देशातील सुजाण जनता  हाणून पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार   नाही.  त्या लोकांना जनतेने बाजूला केल्याची अनेक देशात उदाहरणे आहेत, असे पवारांनी सांगितले.