लोकांच्या टीकेनंतर मोदींनी सीरमला दिला झटका! कोरोना लसीचा ‘तो’ प्रस्ताव मोदींनी आता धुडकावला

0
2571

नवी दिल्ली, दि.११ (पीसीबी) : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केलेला कोविशिल्ड लसीचे ५० लाख डोस युकेला पाठवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला आहे. आंतरराष्ट्रीय दबाव तसंच वाटाघाटी करण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतरही केंद्र सरकारने सिरमची विनंती फेटाळून लावली आहे. सिरमकडून युकेला लस पुरवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, त्याआधारे ही विनंती करण्यात आली होती.

भारताला सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा बळी ठरतोय. लसींचा तुटवडा झाल्याने लसीकरण मोहिमेलाही टाटापुरता पूर्णविराम लागण्याची शक्यता वाटतेय. त्यामुळे अशा परिस्थितीत देशात निर्माण होणाऱ्या लसींचा पुरवठा सर्वात आधी राज्यांना केला जावा आणि त्यानंतरच निर्यातीला परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सिरमला परवानगी नाकारण्यात आली आहे. राज्यांना त्यांच्या मागणीनुसार पुरवठा व्हावा यासाठी सिरमशी संपर्क साधण्यास सांगण्यात आलं आहे. देशात सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण केलं जात असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यांकडून मागणी होत आहे.

आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सिरमशी संपर्क साधत लवकरात लवकर लसींचे डोस मिळवण्याची प्रक्रिया सुरु करण्यास सांगितलं आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लसींच्या कुप्यांवर असणारे लेबल बदलावे लागणार आहेत. युकेला पुरवठा करण्यासाठी पँकिंग करण्यात आल्याने त्यांच्यावर वेगळे लेबल होते. पण आता स्थानिक बाजारात जाणार असल्याने कुप्यांवरील लेबल बदलावे लागतील. एका अधिकाऱ्याने सांगितलं कि, “कोविशिल्ड लसीचे हे ५० लाख डोस आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी उपलब्ध आहेत. राज्यांना हे डोस मिळवण्यास सागंण्यात आलं आहे. खासगी रुग्णालयंदेखील हे लसीचे डोस मिळवू शकतात.”