लोकसभेसाठी अजितदादांची राजकीय सलामी; पिंपरी-चिंचवड बालेकिल्ला परत देण्याचे बाप्पाला घातले साकडे

0
2038

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड हा राजकीय बालेकिल्ला पुन्हा परत मिळवण्याच्या इराद्याने कामाला सुरूवात केली आहे. अजितदादांनी कधी नव्हे, ते पिंपरी-चिंचवडमधील सर्व मोठ्या गणेश मंडळांना भेटी देत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिक टिक पुन्हा वाजू दे, असे साकडे घातले. आता गणपती बाप्पा राष्ट्रवादीला गमावलेला बालेकिल्ला पुन्हा परत मिळवून देतो का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. किंबहुना अजितदादा पवार यांचा अपराजित असलेला गडकोट किल्ला म्हणूनच पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जात. परंतु, या गडकोट किल्ल्याला भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी अशी काही धडक मारली की स्वतः अजितदादाही हतबल झाले. आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली अजितदादांचा वर्चस्व असणारी पिंपरी-चिंचवड महापालिका भाजपने काबिज केली. महापालिकेत प्रथमच कमळ फुलले. त्यानंतर शहराच्या राजकीय क्षेत्रात मोठे बदल होऊ लागले आहेत. आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी या शहरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

आता लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्यानंतर विधानसभा निवडणूक होईल. केंद्रातील भाजपने एक देश एक इलेक्शनचा संकल्प खरा करण्याचे ठरवल्यास लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार झाडून कामाला लागले आहेत. अशातच राज्याच्या राजकारणातील प्रबळ नेते असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार अजितदादांनी पायाला भिंगरी लावूनच आतापासूनच पक्ष प्रचाराला सुरूवात केली आहे. अजितदादांनी गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत पुण्यातील सर्व गणेश मंडळांना भेटी दिल्या.

त्यानंतर अजितदादांनी संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर पिंजून काढले. त्यांनी शहरातील सगळ्या मोठ्या गणेश मंडळांनी भेटी दिल्या. तेथे आरती देखील केली. यापूर्वी अजितदादांनी पिंपरी-चिंचवडच्या गणेश मंडळांना अशा प्रकारे कधीच भेटी दिल्या नव्हत्या. आता त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांना भेटी देत निवडणुकीसाठी सलामी ठोकली आहे. अजितदादांनी थेट बाप्पाला साकडे घालत आपल्या पूर्वाश्रमीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिक टिक पुन्हा वाजू देण्याची प्रार्थना केली आहे. आता गणपती बाप्पा राष्ट्रवादीच्या पदरात काय टाकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.