लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र होणार; शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना

0
1811

मुंबई, दि.  २८  (पीसीबी)  –  राज्यात फेब्रुवारी-मार्चमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आताच निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. सोमवारी (दि. २७) राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तयारीचे आदेश दिल्याचे सूत्रांनी कळते.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणूका एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी ५०-५० टक्के या प्रमाणे जागा वाटप करून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून काँग्रेससमोर ठेवण्यात आला आहे. राज्यात दोन्ही पक्षांची समान ताकद असल्याने निम्म्या-निम्म्या जागांचे वाटप व्हावे, अशी शरद पवार यांची इच्छा आहे. दुसरीकडे भाजपा-शिवसेना यांच्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युतीबाबत अनिश्चतता आहे. युती झाली नाही तर, सरकार त्यांचे असल्याने मुदतपूर्व विधानसभा विसर्जित करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे भाजपकडून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय होऊ शकतो, असे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

निवडणुका एकत्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन पक्षाने नियोजन करायला हवे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर तयारी करणे थोडे अवघड होते. त्यामुळेच शरद पवार यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होईल, हेच डोळ्यासमोर ठेवून तयारी करण्याच्या सूचना केल्याचे मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. डॅमेज कन्ट्रोलसाठी एकत्र निवडणुका घेण्याचा भाजप प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पुढील वर्षी मार्चनंतर आठ राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र घेता येऊ शकेल असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होईल, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.