Maharashtra

लोकसभा लढवण्यास नकार देणारे हिंगोलीचे खासदार राजीव सातव मतदारसंघात सक्रीय

By PCB Author

November 22, 2018

हिंगोली, दि. २२ (पीसीबी) – आगामी  लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार देणारे हिंगोलीचे काँग्रेस  खासदार  राजीव सातव  पुन्हा एकदा मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. विविध कार्यक्रमांना हजेरी लावत मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास त्यांनी सुरूवात केली आहे. त्यामुळे   सातव पुन्हा लोकसभेची निवडणूक लढवणार  असल्याचे  स्‍पष्ट संकेत मिळत  आहेत.  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही  सातव यांनी विजय खेचून आणला होता. पण त्यांनी आगामी निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने पक्षाचे वरिष्ठ नेते बुचकाळ्यात पडले होते.   

गेल्या काही दिवसांपासून खासदार  सातव यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्यास सुरूवात केली आहे. ग्रामीण भागात बैठकांचा धडाका चालू केला आहे. दोन दिवसापूर्वीच त्यांनी औंढा तालुक्‍यातील पिंपळदरी, जलालदाभा येथे बैठक घेतली. तर सोमवारी हिंगोलीत बैठक घेवून प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निवडणुकीची जय्यत तयारी करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर त्यांनी आज (गुरूवारी)  हिंगोली तालुक्‍यातील चिंचोली येथे बैठक घेतली.

लोकसभा मतदारसंघात  विकासकामे करताना   सातव यांनी पक्षाने टाकलेली गुजरात निवडणुकीची जबाबदारी देखील यशस्वी पार पाडून दाखवली आहे. त्यांच्यावर सौराष्ट्र भागाची निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. त्या ठिकाणी काँग्रेसला  मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. या कामगिरीची दखल घेत सातव यांच्यावर गुजरात राज्य प्रभारी पदाची  धुरा सोपविण्यात आली आहे. त्यामुळेच सातव यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, सातव यांनी  मतदारसंघात संपर्क वाढवण्यास सुरूवात केल्याने तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.