लोकसभा निवडणूक संपताच नमो टीव्ही बंद

0
459

नवी दिल्ली,  दि. २१ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान  मोदी यांच्या प्रचारसभा आणि अन्य संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरु  केलेली नमो टीव्ही   लोकसभा निवडणूक संपल्यानंतर बंद करण्यात आली आहे. सातव्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर १७ मे रोजीच नमो टीव्ही बंद  करण्यात आला. ३१ मार्चपासून सुरू केलेले हे चॅनल  वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

विरोधकांनी या चॅनलवर अनेक हरकती घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने  नमो टीव्हीवर मतदानाच्या ४८ तास आधी रेकॉर्डेड शो दाखवण्यास मनाई केली होती. परंतु, यादरम्यान कार्यक्रमांच्या थेट प्रक्षेपणाला परवानगी दिली होती.  यावर विरोधकांनी आचारसंहितेचे उल्लंघन  केल्याप्रकरणी नमो टीव्ही बंद करण्याची मागणी  निवडणूक आयोगाकडे केली होती. याची दखल घेत  आयोगाने माहिती आणि प्रसारण खात्याला नोटीस पाठवली होती.

नमो टीव्ही  भाजप पुरस्कृत आहे, असा दावा  विरोधकांनी केला होता.  हा दावा  पंतप्रधान  मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी  फेटाळून लावला होता. मोदी यांनी एका मुलाखतीत मी स्वत: नमो टीव्ही बघत नसल्याचे सांगितले होते.  मात्र, हे चॅनल सुरु झाले त्यादिवशीच मोदी यांनी ट्विट करून या चॅनलवर ‘मै भी चौकीदार’ हा कार्यक्रम बघण्याचे आवाहन केले होते.