Maharashtra

लोकसभा निवडणूक दुसरा टप्पा: महाराष्ट्रातील १० जागांसाठी ५७.२२ टक्के मतदान

By PCB Author

April 18, 2019

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज (गुरूवार) मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, मराठवाडय़ातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या १० मतदारसंघांत मतदान झाले. या मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ५७.२२ टक्के मतदान झाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, बहुजन वंचित आघाडीचे नेते  प्रकाश आंबेडकर, शिवसेनेचे  आनंदराव अडसूळ,  भाजपच्या प्रीतम मुंडे यांच्यासह राज्यातील १७९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज  मतदान यंत्रात  बंद झाले.

महाराष्ट्रातील मतदानाची मतदारसंघनिहाय  टक्केवारी खालीलप्रमाणे –

बुलडाणा  ५७.०९ टक्के,  अकोला ५४.४५ टक्के,  अमरावती ५५.४३ टक्के,  हिंगोली ६०.६९ टक्के,  नांदेड ६०.८८ टक्के,  परभणी ५८.५० टक्के,  बीड ५८.४४ टक्के,  उस्मानाबाद ५७.०४ टक्के,  लातूर ५७.९४ टक्के आणि सोलापूर ‎५१.९८ टक्के.

राज्यातील १० मतदारसंघात  १ कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार होते. तर  २० हजार ७१६ मतदान केंद्रे होती. दरम्यान, मतदान यंत्रातील तांत्रिक बिघाडामुळे मतदानाला काही ठिकाणी उशीर झाला. किरकोळ घटना वगळता राज्यात मतदान शांततेत पार पडले. मतदान केंद्रावर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. राज्यात पहिल्या टप्प्यासाठी  ११ एप्रिल रोजी विदर्भातील ७ मतदारसंघांमध्ये मतदान झाले आहे.