लोकसभा निवडणूक; तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या

0
824

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी)  – लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज (रविवार)  थंडावल्या. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह देशभरातील १६ राज्यातील ११८ लोकसभा मतदारसंघात येत्या २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील १४ जागांचा समावेश आहे. 

तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी  आज शेवटचा  दिवस असल्याने सर्वच उमेदवारांनी रोड शोवर भर देऊन प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोदींनी तीन सभा घेतल्या, अमित शहा यांनी एक रोड शो केला. तर काँग्रेसनेही तीन सभा घेतल्या.

दुसऱ्या टप्प्यात निवडणूक आयोगाने तामिळनाडूतील वेल्लोर आणि त्रिपूरा पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द केली होती. त्या ठिकाणीही तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार असल्याने १६ राज्यांतील ११८ लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर गुजरातमधील सर्वच्या सर्व २६ लोकसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले, स्वाभिमानीचे राजू शेट्टी, समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव, भाजपचे वरुण गांधी, भाजप नेत्या जयाप्रदा आदींचे भवितव्य २३ एप्रिल रोजी मतपेटीत बंद होणार आहे.